जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात जाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असं पाटील म्हणाले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड हा सीबीआयचा दुरुपयोग असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टानेच या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमानना याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे. कोर्टाने केवल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे?, असा सवाल त्यांनी केला.
सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये 200 हून अधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार असा दावाही त्यांनी केला. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही अलबेल असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल- मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते असे ते म्हणाले.