कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी मालदीवमध्ये जाऊन व्हेकेशन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने, त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. ट्विटरवर या बॉलिवूड सेलेब्सनाही ट्रोल केले गेले होते. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही काही दिवसांपूर्वी या संदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने सेलेब्रिटींवर टीका केले होती. ते म्हणाले, ‘या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनविला आहे. पर्यटन उद्योगाशी त्यांचे काय संबंध आहे हे मला माहित नाही. परंतु माणुसकी म्हणून या सुट्ट्या केवळ आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवा. येथे प्रत्येकजण अस्वस्थ आहे. कोरोनाची प्रकरणे कैक पटींनी वाढत आहेत. ज्यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून त्यांचा अपमान करू नका.’
नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, ‘आम्ही मनोरंजन करणारे लोक आहोत, आपल्याला थोडे मोठे झाले पाहिजे. जर बरेच लोक आपले अनुसरण करतात हे आपल्याला माहित आहे तर, आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.’ नवाजला, तुम्ही कधी मालदीवला जात आहात? असे विचारले असता तो म्हणाला की, ‘बिलकुल नाही, मी बुधाना येथे माझ्या कुटुंबासमवेत आहे. हेच माझे मालदीव आहे.
गेल्या वर्षी लॉकडाउन उघडल्यावर अनेक कलाकार एकाच वेळी मालदीवमध्ये पोहोचले, तेव्हापासून मालदीवमध्ये बॉलिवूड सेलेब्सची वर्दळ वाढते आहे. आता पुन्हा एकदा जेव्हा मुंबईत शूटिंग थांबले, तेव्हा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बॉलिवूड स्टार्स मालदीवमध्ये व्हेकेशन ट्रीपसाठी गेले होते. पण, आता या पुढे हे स्टार्स मालदीवमध्ये जाऊ शकणार नाहीयत.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबईतील लॉकडाऊन वाढताच बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स कामातून ब्रेक घेत मालदीवला रवाना झाले आहेत. या यादीमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, सारा अली खान यांचा समावेश आहे. याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सुट्टीवर मालदीवमध्येही पोहोचले होते. त्याचवेळी श्रद्धा कपूरचा चुलत भाऊ प्रियांक शर्माचे काही दिवसांपूर्वीच मालदीवमध्ये लग्न झाले होते.