बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात घडली. हा प्रकार वैजापूरमधील करंजगाव परिसरात घडला. रात्रीच्या अंधारात हा अपघात झाल्यामुळे येथे काही काळासाठी गोंधळ उडाला. मात्र, अंधारामध्ये बिअरच्या अनेक बॉटल्स फुटल्यामुळे या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच बिअरचे बॉक्स पडल्याचे दिसताच लोकांनी बिअर लुटीसाठी गर्दी केली.
बिअरच्या बॉटल्सचे कंटेनर पलटल्यामुळे वैजापरूमधील करंजगावात एकच खळबळ उडाली. येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिअरच्या बॉटल्सवर डल्ला मारणे सुरु केले. फुकटात महागडी बिअर मिळत असल्यामुळे लोकांनी कंटेनरमधून बिअरचे बॉक्स लंपास केले. तसेच बॉक्ससोबतच खुल्या बिअरच्या बॉटल्सही पळवल्या. हा अपघात झाल्यानंतर वाहनचालक किंवा जखमी लोकांकडे लक्ष न देता लोकांनी बिअर लुटण्यासाठी कंटेनरकडे धाव घेतली.
अपघात झाल्यानंतर काही क्षणांत आसपासच्या अनेक गावातून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही लोकांनी घटनास्थळी दुचाकी आणत बिअरचे बॉक्स पळवले. तर काही लोकांनी पिशव्यांमध्ये बिअरच्या बॉटल्स भरून त्या डोक्यावर ठेवून आपापल्या घरी नेल्या. अपघातस्थळी बिअरच्या लुटीचा सपाटा सुरु होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून हा सर्व प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.