आज दि.२३ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…


तळई येथे दरड कोसळून
३२ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर याखाली जवळपास ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल
पंतप्रधान मोदी यांना शोक

पंतप्रधान मोंदींनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे असे म्हणत ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोकण किनारपट्टीत दोन दिवस
अतिमुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांमध्ये तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच किंबहुना अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

नागरिकांनी खबरदारी बाळगावी,
प्रशासनाला सहकार्य करावे

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्यानंतर शुक्रवारीही पावसामुळे परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री स्वतः पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला,
भारतीय जवानांनी ड्रोन पाडलं

पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनच्या मदतीने लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचं ड्रोन पाडलं. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी हस्तगत झालं आहे. हे ड्रोन भारतीय सीमेच्या आठ किलोमीटर आत पाडलं. पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने आयईडी पुरवून दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

तमिळनाडूमध्ये ६०० कोटी रुपयांचा
गैरव्यवहार, हेलिकॉप्टर बंधूंवर आरोप

भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संघाचे नेते असलेले मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या ‘हेलिकॉप्टर बंधूं’वर ६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते दोघेही फरार असल्याने ‘हेलिकॉप्टर बंधू’ विरोधात जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कंपनीचा व्यवस्थापक श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे. वादानंतर भाजपाने गणेशला पदावरून काढून टाकलं आहे.

ICSE दहावी आणि ISC
बारावीचा निकाल उद्या

ICSE दहावी आणि ISC बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ३ वाजता https://www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. पहिल्यांदाच परीक्षा न घेता दहावी बारावीचा निकाल लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निकाल कधी लागणार?, याबाबत विचारणा केली जात होती. त्यानंतर आता उद्या निकाल लागणार आहे.

कोयना धरणातून ५० हजार
क्युसेक्स पाणी नदी पात्रात

सातारा महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसाने कोयना, धोम धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोयना धरणातून ५० हजार क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. धोम धरणातूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता कोयना धरणाच्या दरवाजातून ३५,१७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

अमरावती विभागात पाचही
जिल्ह्य़ांत सर्वदूर पाऊस

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्य़ांत सर्वदूर पाऊस सुरू असून अकोला जिल्ह्य़ात पावसाची तीव्रता जास्त आहे. विभागात गेल्या चोवीस तासांत बारा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १६८ मि.मी. पाऊस अकोला जिल्ह्य़ातील बार्शीटाकळी तालुक्यात नोंदवण्यात आला. अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा तालुक्यात सिपना नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने दिली
आचरेकर सरांना घरी जाऊन मानवंदना

भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांना त्यांच्या घरी जाऊन मानवंदना दिली. रमांकात आचरेकर यांचे जानेवारी २०१९मध्ये निधन झाले. आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केले.

राज कुंद्रा आणि तोरपे यांना
चार दिवसांची पोलीस कोठडी

शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.


SD social media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.