महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कोकण मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यात कालपासून पुन्हा पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण झाली आहे. औरंबादमध्ये ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला.
पावसाचा मोठा फटका, अनेक ठिकाणी दुकानात पाणी
औरंगाबादमध्ये रात्री मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक भागांत ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. शहरातील काही भागात आणि शहराजवळील नारेगाव पळशी भागातही पाणी साचले आहे. ओढे ओसंडून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी दुकानात पाणी शिरले आहे. सोयगाव सिल्लोड खुलताबाद फुलंब्री औरंगाबाद तालुक्यात या पावसाचा फटका बसला आहे.

नांदर येथील वीरभद्रा नदीला रात्री झालेल्या जबरदस्त पावसामुळे पूर आला आहे. गावात येण्यासाठी असलेले दोन्ही पूल पाण्याखाली गेले. पुरामुळे गावात वेशीपर्यंत पाणी आले होते. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अजूनही पूरस्थिती कायम आहे.

बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावलीय. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आलाय. पाटोदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. शेतात पाणी घुसलंय. नदी नाले ओसंडून वाहात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तालुक्यात अनपटवाडी इथे नदीवर पूल नसल्यामुळे पलीकडच्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पोहून नदी पार करावी लागतेय.

मुसळधार पावसानं झोडपल्यानंतर आता वाशिम जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी, चेहल, धानोरा, दाभा आणि लावना इथं पावसासह गारपीट झालीये. अतिवृष्टीपासून जे थोडं फार पीक शेतात वाचलं होतं. ते पीकही या गारपिटीत भुईसपाट झालंय. फळबागांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले आहे. शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्री दोन तास पावसानं शहराला झोडपलं. पावसाचा जोर इतका होता की दोन तासांच्या पावसानं रस्ते, नाल्या तात्काळ जलमय झाले.

गोंदिया जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर पहाटेपासून पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळत आहेत. त्यामुळे धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे, सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज पहाटे बार्शी तालुक्यातील पानगाव शिवार परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली. निसर्ग सौंदर्याने परिसर खुलून गेला आहे.मात्र या धुक्यामुळे कांदा पिकाला नुकसान देखील होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.