नॅशनल हेराल्ड प्रकरणी इडीने दिल्लीच्या हेराल्ड हाऊसची इमारत यंग इंडियनचं कार्यालय सिल केलं आहे. तपासादरम्यान कार्यालयात कोणीही उपलब्ध नव्हतं, त्यामुळे इडीला तपास करता आला नाही, म्हणून इडीने ही कारवाई केली आहे. इडीच्या परवानगीशिवाय हा भाग उघडता येणार नाही, असं या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे.
पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यालय सिल करण्यात आल्याचं इडीने सांगितलं आहे. मंगळवारी इडीने यंग इंडियनच्या ऑफिसवर धाड टाकली, पण कार्यालयात अधिकृत प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे चौकशी करता आली नाही. नॅशनल हेराल्डचं उरलेलं कार्यालय वापरासाठी उपलब्ध असेल, असं इडीच्या सूत्रांनी सांगितलं.
इडीने यंग इंडियनच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या नोटीसवर तपास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. इडीच्या परवानगीशिवाय कार्यालय उघडता येणार नाही, असे स्पष्ट आदेश नोटीसवर लावण्यात आले आहेत. इडीच्या टीमने छापा टाकण्यासाठी परिसर उघडण्यासाठी कार्यालयाचे प्रधान अधिकारी/प्रभारी यांना इ-मेल पाठवला, पण त्यांच्या उत्तराची इडी अजून वाट बघत आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचं प्रकाशन असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) करतं आणि या कंपनीची भागेदारी यंग इंडियनकडे आहे. नॅशनल हेराल्ड एजेएल नावाने नोंदणीकृत आहे. याआधी इडीने मंगळवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली दिल्ली आणि इतर जवळपास 12 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये बहादुर शाह जफर मार्गावरच्या हेराल्ड हाऊसचाही समावेश होता. हा पत्ता असोसिएटेड जर्नल लिमिटेडच्या नावावर नोंदणीकृत आहे, जे नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचं प्रकाशन करते.
सोनिया-राहुल गांधींची चौकशी
नॅशनल हेराल्ड केसमध्ये इडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. या चौकशीवरून काँग्रेसने विरोध आणि आंदोलन केलं. सोनिया गांधींची चौकशी झाली तेव्हा राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले होते. या नेत्यांना नंतर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सोनिया गांधी यांची सगळ्यात आधी 21 जुलैला 2 तास चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी इडीला 28 प्रश्नांची उत्तरं दिली होती. इडी काँग्रेस पुरस्कृत वृत्तपत्र नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करत चौकशी करत आहे. इडीने सोनिया गांधी यांच्याआधी राहुल गांधी यांचीही या प्रकरणावरून बरेच तास चौकशी केली.