लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून सुरु असलेला वाद लवकरच संपण्याची आशा सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केली आहे. ते म्हणाले की, या महिन्यात दोन्ही देश यावर दीर्घकालीन तोडगा काढू शकतात. लेह इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याला सैन्यप्रमुखांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 6 महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरची परिस्थिती अगदी सामान्य आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही देशांमधील चर्चेची 13 वी फेरी होऊ शकते, या बैठकीत डेडलॉक संपवण्याबाबत चर्चा होईल.
सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले की, सर्व वादग्रस्त मुद्दे एक एक करून सोडवले जात आहेत. जगातील सर्वात मोठा हस्तनिर्मित खादी तिरंगा लेहमध्ये फडकवण्यात आला आहे. याच कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर सैन्यप्रमुखांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘परस्पर संवादाद्वारे हा अडथळा दूर होऊ शकतो यावर माझा नेहमीच विश्वास आहे. मला आशा आहे की, आम्हाला लवकरच हा मुद्दा निकाली काढू.
पूर्व लडाख आणि आमच्या पूर्व कमांडजवळच्या उत्तर आघाडीवर मोठ्या संख्येने चिनी सैनिक तैनात आहे. या मुद्द्यावर बोलताना सैन्यप्रमुख म्हणाले की, ‘सीमेवर चिनी सैनिकांची वाढती तैनाती ही निश्चितच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. आम्ही प्रत्येक हालचालीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहोत. ” त्यांनी सांगितले की, ‘आम्हीही सीमेवर पायाभूत सुविधा आणि कर्मचारी तैनात करत आहोत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या धोक्याला त्वरित सामोरे जावे लागल्यास, अडचण येऊ नये.
सैन्यप्रमुख एमएम नरवणे यांनी पाकिस्तानकडून सीजफायर उल्लंघन होत असल्याचं सांगितलं, ते म्हणाले की, फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंत पाकिस्तानकडून कोणतेही उल्लंघन झाले नाही. पण त्यानंतर घुसखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसात पाकिस्तानकडून दोनदा सीजफायरचं उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा एकदा फेब्रुवारी पूर्वीसारखीच होत आहे.