अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जलद गतीने होण्यासाठी ‘ई पीक पाहणी’ पंचनाम्याची अट काही दिवसांसाठी शिथिल करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहेत. महसूल मंत्री विखे गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. आज, मंगळवारी त्यांनी शेवगाव व पारनेर तालुक्याला भेट देत शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला.
पंचनामा करताना ‘ई पिक पाहणी’साठी अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. पंचनाम्याबाबत तक्रारी व त्रुटी राहू नयेत, त्यासाठी आपण सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आता काही दिवसांसाठी ई-पीक पाहणीची अटही शिथिल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.