आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही भारताचे मोठय़ा विजयाचे ध्येय
पीटीआय, नवी दिल्ली : पहिल्या सामन्यातील दमदार कामगिरीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुन्हा मोठय़ा विजयाचे ध्येय बाळगून मैदानात उतरेल. गेल्या जवळपास दीड दशकापासून भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या चेतेश्वर पुजारासाठी हा सामना खास ठरणार आहे. त्याचा हा कसोटी कारकीर्दीतील १००वा सामना असेल. त्यामुळे पुजारा या शतकी कसोटीत कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
भारतीय संघाने नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत डावाने विजय मिळवला. हा सामना केवळ तीन दिवस चालला. मात्र, या विजयानंतरही भारताला आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीची चिंता आहे. नागपूरच्या फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी साकारली. मात्र, त्याला आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे दिल्ली येथील होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत फलंदाजांचे कामगिरी सुधारण्याचे लक्ष्य असेल. विशेषत: पुजाराचा मोठय़ा खेळीचा प्रयत्न असेल.
पुजाराला गेल्या काही वर्षांत कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे त्याने भारतीय कसोटी संघातील स्थानही गमावले होते. त्यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले, पण त्याला अजूनही पूर्वीसारखा सूर गवसलेला नाही. त्याने गेल्या वर्षीच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. मात्र, त्यापूर्वीचे शतक त्याने २०१९ मध्ये केले होते. आता आपला शतकी कसोटी सामना कारकीर्दीतील २०व्या शतकासह साजरा करण्याचा पुजाराचा मानस असेल. तसेच घरच्या मैदानावर खेळणारा विराट कोहलीही खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी उत्सुक असेल. कोहलीने नोव्हेंबर २०१९ पासून कसोटीत शतक केलेले नाही.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या कसोटीतील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार पुनरागमनासाठी प्रयत्नशील असेल. पहिल्या कसोटीत पदार्पणवीर ऑफ-स्पिनर टॉड मर्फीचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगला खेळ करता आला नाही. मात्र, मिचेल स्टार्क आणि कॅमेरुन ग्रीन यांसारख्या खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता असल्याने ऑस्ट्रेलियन संघाला बळकटी मिळेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात अधिक चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे.
श्रेयस अय्यरचे पुनरागमन?
श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीतून सावरला असून दुसऱ्या कसोटीसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल. मात्र, श्रेयस गेल्या महिन्याभरात एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला थेट कसोटी सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल. त्याला अंतिम ११मध्ये स्थान देण्याचा निर्णय झाल्यास सूर्यकुमार यादवला संघाबाहेर बसावे लागू शकेल.
- वेळ : सकाळी ९.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी