आज दि.१७ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

नाव अन् चिन्ह दोन्ही शिंदेंना, पाच मुद्यांनी समजून घ्या आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाने शिंदे विरुद्ध ठाकरे गटात शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून सुरू असलेल्या वादावर मोठा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

1. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेवरही मत व्यक्त केलं आहे. शिवसेनेची घटना ही लोकशाहीला धरून नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं.

2. लोकशाही पायदळी तुडवून पक्षात पदाधिकाऱ्यांची कोणत्याही निवडणुकीशिवाय नियुक्ती केली असे निवडणूक आयोगाने म्हटले.

3. शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलंय.

4. शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आल्या त्याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आलेली नाही.

5. शिवसेनेच्या मूळ घटनेतील लोकशाहीविरोधातील नियम १९९९ मध्ये आय़ोगाने स्वीकारले नव्हते. ते नियम गुपचूपपणे घटनेत अॕड करण्यात आले असल्याचं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले.

‘मानसिक संतुलन बिघडलं का?’, शरद पवारांवरच्या विधानानंतर अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आजारी असलेले खासदार गिरीश बापट प्रचारासाठी आले. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअर आणि बोटाला ऑक्सिमीटर लावून बापट प्रचाराला आले होते, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या आजारपणावर भाष्य केलं.

‘शरद पवारांची तब्येत 2006 पासून बिघडलेली आहे, त्यानंतरही ते पक्षासाठी फिरत आहेत. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार हे एकच कार्यकर्ते आहेत, बाकी सगळे भाषण करणारे नेते आहेत. राष्ट्रवादी शरद पवारांना प्रचारासाठी कसब्यात बोलावणार आहे, हे अमानवी नाही का?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटलांच्या या टीकेवर अजित पवारांनी पलटवार केला आहे. ‘2004 साली पवार साहेबांना गंभीर आजार झाला, त्यावेळी त्यांनी आम्हाला पुण्यामध्ये आमची बैठक बोलावली आणि आम्हाला सांगितलं यावेळच्या निवडणुकीमध्ये सेनापती आजारी आहे. मी आता फॉर्म भरणार आणि ऑपरेशन करणार, त्यानंतर 2004 सालची निवडणूक तुम्हाला चालवायची आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं. त्या प्रसंगाला सामोरं जायचं आम्ही ठरवलं,’ असा 2004 सालचा घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला.

“निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला”, संजय राऊत यांची घणाघाती टीका, म्हणाले, “४० बाजारबुणगे विकत घेतात..”

देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदविण्यात आली आहे.खासदार संजय राऊत म्हणाले की, “सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला.”

“संघ नव्हे तर अदानी धोरण ठरवतात, मोदी अंमलबजावणी करतात” काँग्रेसची टीका

भाजप प्रणित नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धोरण ठरवते आणि त्यांची अंमलबजावणी मोदी सरकार करते, असे वाटत होते. परंतु आता वेगळेच चित्र समोर आले आहे. उद्योजक गौतम अदानी धोरण ठरवतात, मोदी त्याची अंमलबजावणी करतात आणि संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत त्याला प्रमाणित करतात, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

IPLचे बिगुल वाजले! पहिला सामना ३१ मार्चला तर २८ मे रोजी अंतिम सामना

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) माहिती दिली की, पहिला सामना ३१ मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे आव्हान असेल. २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.५२ दिवसांत १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. १८ डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळेल. गेल्या वेळी गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळला. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला होता.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.