राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे आगामी काळात आमचाच मुख्यमंत्री होईल जाहीर वक्तव्य करत असतानाच दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पण त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा मग मी मुख्यमंत्री होईल, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पाळधी या गावात सभा पार पडली. या सभेत मनोगत व्यक्त करतांना मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
गुलाबराव पाटील यांच्या भाषणापूर्वी आमदार किशोर पाटील यांनी कॅबिनेटच्या मंत्रिपदानंतर आता थेट गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, असं वक्तव्य केलं होतं.त्यानंतर आपल्या भाषणावेळी उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘हा गुलाबराव पाटील मंत्री होतो का नाही ते शक्यच नव्हते जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे ते होऊ शकलं. आता आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान झाले तर मला मुख्यमंत्री होता येईल, असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.