जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज आयपीएल 2023 चा सातवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. गुजरातने दिल्लीच्या होम ग्राउंडवर खेळवण्यात आलेला सामना 6 विकेट्सने जिंकला.
आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सुरुवातीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला. यावेळी दिल्लीकडून कर्णधार डेव्हीड वॉर्नरने 37, सर्फराज खानने 30, अभिषेक पोरेलने 20, अक्षर पटेलने 36 धावा केल्या. तर उर्वरित फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या देखील करता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स देऊन 162 धावा केल्या. गुजरातकडून रशीद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अल्झारी जोसेफने 2 विकेट घेतल्या.
दिल्लीने गुजरात टायटन्सला विजयासाठी 163 धावांच आव्हान दिल्यानंतर गुजरातकडून शुभमनं गिल आणि वृद्धिमान साहा मैदानात आले. परंतु 14 धावा करून तिसऱ्या ओव्हरमध्ये वृद्धिमान साहाची तर पाचव्या ओव्हरमध्ये 14 धावा करून शुभमन गिलची विकेट पडली. त्यानंतर साई सुदर्शनने गुजरातचा डाव सावरला. त्याने 48 चेंडूत गुजरातला 62 धावा करून दिल्या. त्यानंतर विजय शंकरने देखील त्याचा इम्पॅक्ट दाखवत 29 धावा केल्या आणि डेव्हिड मिलरने 16 चेंडूत 31 धावा केल्या. अशाप्रकारे गुजरात टायटन्सने 19 व्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 163 धावा केल्या आणि सामना जिंकला. दिल्लीकडून अॅनरिक नॉर्टजे याला 2 विकेट्स घेण्यात यश आले. मिचेल मार्श आणि खलील अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.