बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सितरंग चक्रीवादळाचा परिणाम आता दिसून येत आहे. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकले. बांगलादेशात सितरंग चक्रीवादळाच्या तडाख्याने पाच जणांचा मृत्यू झाला. बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यातील पाच जणांचा या चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्यू झाला आहे, असे आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने म्हटले आहे.
भारतातही दिसणार परिणाम –
चक्रीवादळ सितरंग हे 24 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता ढाकापासून 40 किमी पूर्वेला कोस्टल बांगलादेशच्या दिशेने केंद्रित झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पुढील 6 तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रात आणि त्यानंतरच्या 6 तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व, ओडिसा, पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्यावर पावसाच्या ढग तयार झाले आहेत. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यापूर्वी सोमवारी बांगलादेशातील 2.19 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. हे चक्रीवादळ रात्रीच्या वेळी दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर धडकू शकते, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापनाने आधीच दिली होती. तर बांगलादेशी अधिकाऱ्यांनी 6,925 निवारा केंद्रे तयार केली आहेत. याठिकाणी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बाधित लोक आश्रय घेऊ शकतात, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद मोनिरुझमान यांनी म्हटले आहे.
चक्रीवादळ सितरंगमुळे दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आधीच दिसून येत आहे, तर ढाकासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये संततधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आपल्या अहवालात, पायरा, मोंगला आणि चितगाव बंदरांना धोक्याचे सिग्नल वाढवण्यास सांगितले आणि कॉक्स बाजार बंदरांना 10 च्या प्रमाणात धोक्याचा सिग्नल क्रमांक 6 कायम ठेवण्याचा सल्ला दिला.दक्षिण-पश्चिम पटुआखली, भोला, बरगुना आणि झलकाठीला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर रेड क्रिसेंट सोसायटीने सरकारी संस्थांसह हजारो स्वयंसेवकांना एकत्र केले.