शिंदे सरकार कोसळणार विरोधक हे दिवा स्वप्न पाहत आहेत ते कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून पवार साहेब हे राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत. त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कदापि पूर्ण होणार, अशी टीका बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केली.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे शनिवारी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान शिवतारे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी भेट दिली आहे आणि या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
राज्यात असणारे भाजप शिंदे गटाचे सरकार हे केव्हाही कोसळेल आणि अजित पवार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येतंय. त्यावर विजय शिवतारे म्हणाले की, ‘विरोधक हे दिवा स्वप्न पाहत आहेत. ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. 1978 पासून पवार साहेब हे राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत त्यामुळे हे स्वप्नच राहणार ते कदापि पूर्ण होणार नसल्याचं शिवतारे म्हणाले.
तर, पुणे जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक खासदार आमदार एकत्रितपणे या पुणे जिल्ह्याला एक सक्षम आणि उत्तम पर्याय देण्याचं काम करतील.
पुणे जिल्ह्यात काम करणे इतके सोपे नाही याची आम्हालाही जाणीव आहे. काही बलाढ्य शक्ती आहेत. आम्ही साधी माणसं आहोत. बलाढ्य शक्तीस्थाने आमच्याकडे नाहीत पण तळागाळातल्या माणसांना घेऊन आम्ही हे काम करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले.