शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. सकाळी साडे सात वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली.
या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे. एकूण २५६ मतदान केंद्रांवर, ८१ हजार मतदारांनी हक्क बजावला.
आज मतमोजणी केंद्रावर एकाचवेळी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका टेबलवर एक EVM मशिन म्हणजे प्रत्येकी १ हजार मतांची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार आहे. एकूण ७० टेबलवर मतमोजणी होणार आहे.
भाजपची लढण्याआधीच माघार
दरम्यान, अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही.
अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. पण अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तशी विनंती केली. त्यानंतर भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यामुळे आता लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.