मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान,” अशी भावूक प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे आज (16 मे) कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
राहुल गांधी यांचे ट्वीट
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी (16 मे) सकाळी 5 वाजता कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.
19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.