पंतप्रधान मोदींकडून ‘आप’चं अभिनंदन, सहकार्याचं आश्वासन

राजधानी दिल्लीतून सीमोल्लंघन करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये आपला झाडू फिरवलाय. सत्ताधारी काँग्रेसला धुळ चारत आपनं पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला आहे. 117 जागांपैकी आप सध्या 92 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 18 जागी आघाडीवर आहे. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झाला आहे. इतकंच नाही तर पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आज बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलंय. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण याठिकाणी पाहणार आहोत.

दरम्यान, पंजाब निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपचे अभिनंदन केले आहे. तसेच, पंजाबच्या कल्याणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदींनी ट्विट करत आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलंय की, पंजाब निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. मी पंजाबच्या कल्याणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.

अरविंज केजरीवाल म्हणाले की कॅप्टनसाहेब हरले, चन्नीही हरले, नवज्योतसिंह सिद्धू हरले. हा मोठा विजय आहे. भगतसिंग म्हणाले होते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण व्यवस्था बदलली नाही तर काही बदललं नाही. पंजाबच्या जनतेनं यावेळी व्यवस्था बदलली आहे. तर आपने देशात व्यवस्था बदलली आहे.

माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं. केजरीवाल दहशतवादी असल्याचं म्हटलं गेलं. मात्र या निकालातून जनतेनं सांगितलं की केजरीवाल दहशतवादी नाही तर या देशाचा खरा पुत्र आहे, अशा शब्दात केजरीवाल यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.