कोरोना लसींचे तब्बल
४५ लाख डोस वाया
एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या अर्जामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात ११ एप्रिलपर्यंत कोरोना लसींचे तब्बल ४५ लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारने केलाय. लस वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये पाच राज्य आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १० कोटी ३४ लाख लसींचा वापर करण्यात आला आहे तर ४४ लाख ७८ हजार लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत.
सकाळी ७ ते ११ यावेळेत किराणा,
भाजीपाला, फळे मिळणार
राज्यात संचारबंदीसोबतच इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांमध्ये आता अजून वाढ करण्यात आली असून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषत: सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्येच किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हे नियम लागू केले जाणार आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली असून आता या ४ तासांमध्येच सगळी गर्दी होईल, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना
कोरोनाची लागण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. नुकतंच राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान
एक मोठे युद्ध होण्याची शक्यता
२०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक मोठे युद्ध होण्याची शक्यता असलेला अहवाल अमेरिकेची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने त्यांचा ग्लोबल ट्रेन्डस रिपोर्ट अमेरिकेच्या सरकारकडे दिला आहे. हा अहवाल सगळेच देश गंभीरतेने घेत असल्यामुळे त्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावे लागेल. फाइव्ह इयर रिजनल आउटलूक रिपोर्ट-साउथ एशिया या अहवालात दक्षिण आशिया प्रदेशामध्ये अस्थिरता येणार असून अशांतताही पसरणार आहे.
श्रीरामनवमी , महावीर जयंती
साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन
श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. तसेच २५ एप्रिलला असलेली महावीर जयंती देखील साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासंबंधीचे आदेश आणि नियमावली जारी करण्यात आले आहे.
देशात मोदी नावाचा कायदा
आलाय का ? : नवाब मलिक
माझा राजीनामा मागताय… पोलिस ठाण्यात तक्रार देताय… राज्यपालांकडे जाताय… या देशात मोदी नावाचा कायदा आलाय का ? त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांकडे देण्यात आले आहेत का ? मोदी कायदा आला असेल आणि अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे असेल तर त्याची माहिती द्यावी अशी मागणी करतानाच मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला. भाजपकडून सरकारवर आणि वैयक्तिक वारंवार होणाऱ्या टिकेला आज नवाब मलिक यांनी उत्तर दिले. भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे संकेतही दिले.
अभिनेते किशोर नांदलस्कर
यांचं कोरोनाने निधन
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.किशोर यांनी आत्तापर्यंत साधारण ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. ‘नाना करते प्यार’ हे त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरील शेवटचं नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली, कुंकू हसलं’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ‘जिस देश मे गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘हलचल’,’सिंघम’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. भूमिका छोट्या असल्या तरी या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.किशोर हे हृदयविकार तसंच मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची बायपासही झाली होती.
सीबीएसई बारावीच्या
परीक्षा रद्द करा
सीबीएसई बोर्डानं बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा ऑनलाईन घ्याव्यात यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी सोशल मीडियावर बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांनी आता Cancel CBSE 12th Exam हा ट्रेंड चालवत आहेत. तर, काही विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करत आहेत. मोठ्या देशांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होत आहेत. सीबीएसई बोर्डाच्या नव्या तारखेची प्रतीक्षा आहे.
इस्त्रायलमध्ये मास्क
वापरण्याचा निर्बंध हटविला
इस्त्रायलमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हे, तर हास्य उमटत असल्याचे छायाचित्रे व्हायरल झाल्याने यातून सुटका होण्याची आशा इतर देशांमध्येही निर्माण झाली आहे. जवळपास ८१ टक्के लोकांचे लसीकरण केल्यानंतर इस्त्रायलने घराबाहेर पडताना मास्क वापर्याचा निर्बंध हटविला आहे, त्यामुळे बहुतेक सर्व लोकांनी मास्क वापरणे सोडून दिले आहे. मास्कचे निर्बंध हटविण्याचा आदेश देणारा इस्त्रायल जगातील पहिला देश ठरला आहे. २०१९ च्या अखेरीस चीनमधून इतर देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने लाखो लोकांचा जीव घेतलेला आहे.
खुल्या बाजारातही लस
विक्री करण्यास मंजुरी
केंद्र सरकारने १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याची घोषणा केली आहे. १८ वर्षांवरील सर्व लोकांना आता लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने आता खुल्या बाजारातही विक्री करण्यास मंजुरी दिलेली आहे. लशींच्या किमती पूर्वनिर्धारित असतील. त्याशिवाय राज्य सरकारला खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
फडणवीस यांना त्यांच्या
पुतण्यानेच अडचणीत आणले
सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या फडणवीस यांना त्यांच्या पुतण्यानेच अडचणीत आणले आहे. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये कोरोना लस घेतल्यानंतर त्याचा फोटो सोशल मिडियात शेअर केला. विशेष म्हणजे, तन्मय याचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसताना त्याने लस कशी घेतली, असा प्रश्न सोशल मिडियातून विचारला जाऊ लागला. हे प्रकरण चांगलेच तापल्याने अखेर तन्मय याने सोशल मिडिया अकाऊंटवरील तो फोटो डिलीट केला. मात्र, यासंदर्भात फडणवीस यांच्यावर सध्या प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, तुमचा पुतण्या आहे म्हणून लस दिली का, १ मे नंतर लस घेतली असती तर काही बिघडले असते का अशा प्रश्न आणि पोस्टचा तुफान मारा यानिमित्ताने होत आहे.
कोरोना रुग्णसंख्येचे
सर्व विक्रम मोडित
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दररोज वाढत्या रुग्णसंख्या आणि मृत्युमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सध्याच्या आकडेवारीने देशातील कोरोना रुग्णसंख्येचे मागील सर्व विक्रम मोडित काढले आहेत. गेल्या २४ तासात २.७४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून, १,६१९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेल्या राज्यांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
लहान मुलांना सांभाळा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना कोव्हिडच्या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास या कारणांमुळे लहान मुलं वेगाने बाधित होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
ज्यादा पगार देऊनही
पुण्यात डॉक्टरांचा तुटवडा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा जवळपास कोलमडण्याच्या स्थितीत आहे, ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. मात्र, आता पुणे जिल्हा परिषदेने लाखो रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी दाखवूनही डॉक्टर्स मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुण्यात आरोग्य सुविधांपाठोपाठ डॉक्टर्सचाही तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
मुंबई बॉम्बस्फोट आरोपीचा
कोरोना संसर्गानंतर मृत्यू
मुंबई मध्ये 2006 मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचा नागपूरच्या कारागृहात मृत्यू झाला. कोरोना संसर्गानंतर कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याने प्राण सोडले. कमाल अहमद हा मूळ बिहारचा रहिवासी होता. मुंबईत 2006 मध्ये लोकल रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कमालसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
SD social media
9850 60 3590