इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा 50 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 19.3 ओव्हरमध्ये 148 रनवर ऑल आऊट झाला. पहिले अर्धशतक करणारा हार्दिक पांड्या बॉलिंगमध्येही चमकला. त्याने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन 4 विकेट घेतल्या. याशिवाय आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या अर्शदीप सिंगलाही 2 विकेट मिळाल्या. युझवेंद्र चहलने 2 तर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का दिला. जॉस बटलर पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर इंग्लंडने सातत्याने विकेट गमावल्या. मोईन अलीने सर्वाधिक 36 रन केले. तर हॅरी ब्रुकने 28 आणि क्रिस जॉर्डनने नाबाद 26 रनची खेळी केली.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 198 रन केले. हार्दिक पांड्याने 33 बॉलमध्ये सर्वाधिक 51 रन केले. हा त्याचा टी-20 आंतरराष्ट्रीयमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवने 19 बॉलमध्ये 39 तर दीपक हुड्डाने 17 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. इंग्लंडकडून जॉर्डन आणि मोईन अली यांना 2-2 विकेट मिळाल्या, तर टॉपली, मिल्स आणि पार्किनसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
टीम इंडियाने पहिल्या 14 ओव्हरमध्ये 150/4 एवढा स्कोअर केला, पण डेथ ओव्हरमध्ये टीमला आणखी आक्रमक होता आलं नाही. शेवटच्या 6 ओव्हरमध्ये भारताने 48 रनच्या मोबदल्यात 6 विकेट गमावल्या.