दहावीत शिकणाऱ्या दोन तुकड्यांमधील झालेल्या हाणामारीत चक्क एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील शाळेतून हा थरारक प्रसंग समोर आला आहे. ज्यात 15-16 वर्षांच्या मुलांनी त्यांच्यात वयाच्या विद्यार्थ्याचा जीव घेतला.
ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये शाळेत हत्येचा थरार
दहावीचे अत्यंत महत्वाचे वर्ष व त्यात कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. आता शाळा उघडली व सहामाही परीक्षा सुरु असल्याने सर्वच शाळेतील विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागली असल्याचे चित्र दिसत असताना काही मुले मात्र भलत्याच कृत्यात अडकली. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या शाहू महाराज विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोन तुकड्यांमधील झालेल्या हाणामारीत चक्क एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शाळेजवळील प्रगती रुग्णालय येथील पाईपलाईन ब्रिजवर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात तीन विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षीय विद्यार्थ्याची छातीत सुरा खुपसून निर्घृण हत्या केली. विद्यार्थ्यावर झालेला वार इतका जोरदार होता की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर उचित कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितले.