अहमदनगरच्या इतिहासात आज खूप महत्त्वाची घटना घडली. अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉरद्वारे डॉ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या हॉस्पिटलमधून पुण्यातील चार रुग्णांसाठी अवयव घेवून जाण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे 25 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याचा ब्रेन डेड झाल्याचं रुग्णालय प्रशासनाने जाहीर केलं होतं. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांनी या कठीण परिस्थितीत आपलं दु:ख सावरत तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने चार रुग्णांचे जीव वाचणार आहेत.
अवयव दान करण्याबाबत अनेक नागरिकांच्या मनात वेगवेगळ्या धारणा आहेत. पण अवयव दानामुळे इतर रुग्णांना जीवनदान मिळतो. मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयव दान केल्याने इतर रुग्णांना प्रत्यारोपणातून जीवनदान मिळू शकतं. त्यामुळे अनेक रुग्णांलयामध्ये तसेच सामाजिक संस्थांकडून याबाबत जनजागृती केली जाते. औरंगाबादच्या मृतक तरुणांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकांकडून आभार व्यक्त केले जात आहे. खरंतर घटना खूप वाईट घडली आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोगर कोसळला आहे. पण अशा परिस्थितीत त्यांनी मृतक तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांनाच घेता येत नाही. त्यांच्या या निर्णयानंतर विखे पाटील रुग्णालयाकडूनही पूर्ण तयारी केली गेली. स्वत: खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष देवून ग्रीन कॉरिडॉरसाठी प्रयत्न केले आणि आज ग्रीन कॉरिडोअरने चार अवयव अहमदनगरहून पुण्याला पाठवण्यात आले.
ग्रीन कॉरिडॉरने अवयव पाठवण्याआधी सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. “आज डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे आम्ही कॅडेव्हरिक डोनरचा यशस्वी प्रयोग करत आहोत. नगर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय. एक 25 वर्षांचा तरुण मुलगा, ज्याचं दुर्देवाने अपघातात निधन झालं, अशा रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढाकार देवून अवयव दानासाठी आम्हाला परवानगी दिली. गेल्या 48 तासात सर्व कायदेशीर परवानग्या पूर्ण करत त्या तरुणाच्या दोन किडनी, एक लिव्हर आणि पॅनक्रिआज अशा पद्धतीने चार ऑर्गन काढून एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलं आहे. रात्री साडेआठ वाजता पोलिसांच्या फौजफाट्यासह अॕब्युलन्सने ग्रीन कॉरिडोअरच्या मार्फत पुण्यातील जुपिटर, ओपोलो आणि सह्याद्री हॉस्पिटल या तीन हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अवयव प्रत्यारोपण केलं जाईल. मृतक तरुणाच्या कुटुंबियांनी या दुखद प्रसंगातून अवयव दान करण्याचं पुण्याचं काम केलं त्याचं मी खासदार या नात्याने मनापासून आभार मानतो. त्यांनी खरं पुण्याचं काम केलं”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.