भारतीय चाहत्यांना मोठा धक्का !
मेरी कोम बॉक्सिंगमध्ये पराभूत
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. 16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इग्रिट लोरेना वॅलेन्सियाशी झाला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली.
केरळमध्ये पुन्हा
लॉकडाऊन घोषित
केरळमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. केरळमध्ये कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे आता राज्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पूर्ण लॉकडाऊन लागू केला गेला आहे. दरम्यान, हा लॉकडाऊन दोन दिवसांचा असेल. त्याचबरोबर केंद्र सरकार सहा सदस्यांची टीम पाठवित आहे. केरळ सरकारने लॉकडाऊनबाबत आज ही घोषणा केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या
दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यावर
पुन्हा मुसळधार पावसाचे संकट
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानातील बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.
पूरग्रस्तांच्या खात्यावर
दहा हजार जमा होणार
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य, कपडे, भांडी खरेदीसाठी तत्काळ १० हजार रुपयांची मदत वाटप सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु आहेत. उद्या शुक्रवारपासून ही १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी,
EWS आरक्षण लागू होणार
देशातील मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया कोटा अंतर्गत वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींना २७ टक्के, आर्थिक मागसवर्गीय विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे याबाबत मागणी होत होती. अखेर सरकारनं त्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी खासदारांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली होती.
अमेरिकेतील पेनिनसुलात
भूकंपाचा तीव्र धक्का
अमेरिकेतील अलास्का पेनिनसुलात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. यामुळे हादऱ्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्यातरी कोणत्याच जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि गावांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
प्रताप सरनाईक यांचा सोमय्या
यांच्यावर मानहानीचा दावा
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर किरीट सोमय्यांनी सातत्याने टीका केल्यानंतर प्रताप सरनाईक चांगलेच भडकले आहेत. किरीट सोमय्यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी अशी भूमिका सरनाईकांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. सरनाईक यांनी सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
खासगी शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी
कमी करण्याचा निर्णय
करोनाकाळात पालकांना दिलासा देण्यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांचे खासगी शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. शाळांच्या शुल्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.
बारामतीत कोरोना
रुग्णांची संख्या वाढली
कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही लाट येण्यापूर्वीच बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. काल बारामतीत एकाच दिवसात 69 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासानाचे धाबे दणाणले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटील
यांच्यावर अँजिओग्राफी
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. दरम्यान, जयंत पाटील यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यांच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवला आहे. अन्य सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं टोपे यांनी सांगितलं. उद्या त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये मनसे
स्वबळावर लढणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
SD social media
9850 60 3590