प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा राष्ट्रपती कार्यालयातून करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून कला क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तर, जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्कारांमध्ये 4 पद्मविभूषण,17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात 34 महिलांचा समावेश आहे तर परदेशी/एनआरआय अशा 10 व्यक्तीचा समावेश आहे. तसेच, 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक म्हणून पद्म पुरस्कारांचा गणले जात असून कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार ४ जणांना देण्यात आला असून यात महाराष्ट्राच्या प्रभा अत्रे तसेच नागरी सेवांसाठी उत्तराखंडचे जनरल बिपिन रावत (मरणोत्तर), साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्तर प्रदेशमधील राधेश्याम खेमका (मरणोत्तर) आणि सार्वजनिक व्यवहारसाठी कल्याण सिंह (मरणोत्तर) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
उच्चपदस्थ सेवेसाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्मभूषण’ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला ( व्यापार आणि उद्योग), उत्तर प्रदेशचे वशिष्ठ त्रिपाठी (साहित्य आणि शिक्षण), रशीद खान (कला), पश्चिम बंगालचे व्हिक्टर बॅनर्जी (कला), बुद्धदेव भट्टाचार्जी (सार्वजनिक व्यवहार), राजस्थानचे देवेंद्र झाझरिया (स्पोर्ट्स), राजीव महर्षी (नागरी सेवा), जम्मू आणि काश्मीरचे गुलाम नबी आझाद (सार्वजनिक व्यवहार), गुजरातचे स्वामी सच्चिदानंद (साहित्य आणि शिक्षण), तेलंगणाच्या कृष्ण एला आणि सुचित्रा एला (व्यापार आणि उद्योग), ओडिशाच्या कु. प्रतिभा रे (साहित्य आणि शिक्षण), युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील मधुर जाफरी (पाकशास्त्र), सत्य नारायण नडेला (व्यापार आणि उद्योग), सुंदरराजन पिचाई (व्यापार आणि उद्योग) यांचा समावेश आहे. तसेच मेक्सिको येथील संजय राजाराम (विज्ञान आणि अभियांत्रिकी) आणि पंजाबमधील कु. गुरमीत बावा (कला) यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.