ओबीसींच्या डेटामध्ये तब्बल 69 लाख चुका होत्या : चंद्रशेखर बावनकुळे

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारचं खोटं बोल रेटून बोल आणि ओबीसींचा सत्यानाश कर असा धोरण आहे, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ओबीसींच्या डेटामध्ये तब्बल एकूण 69 लाख चुका होत्या. तरीही काल पृथ्वीराज चव्हाण हे सर्व माहीत असताना खोटे बोलले असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, या सरकार मधील तिन्ही पक्षांची नौटंकी सुरू आहे. कधी शरद पवार बैठक बोलवतात, कधी काँग्रेस नेते त्यांच्याकडे जातात आणि इकडे नाना पटोले स्वबळाची भाषा बोलतात. खरं पाहिलं तर जनतेचे लक्ष विकास आणि इतर आवश्यक मुद्द्यांपासून दूर करण्यासाठी या सरकारचे नेते फक्त राजकीय विधान करत आहेत, या नेत्यांनी राजकीय विधाने करणे सोडून विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावे असे बावनकुळे म्हणाले.

नाना पटोलेंमध्ये खरी हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्याच गोंदिया भंडारा जिल्ह्यांमध्ये झालेल्या एक हजार कोटींच्या धान घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी करावी. नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा करण्यापेक्षा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करावा, त्यांना कोणी रोखले आहे. नाना पटोले यांनी राजकीय विधाने करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा न मिळालेला धानाचा बोनस त्यांना मिळवून द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान, मीडियाचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचे आणि नंतर मीडियाच्या दबावामुळे तो पुन्हा मिळाल्याचे समोर आले. नाही तर या सरकारला एकनाथ खडसे यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं आणखी नुकसान करण्याचा डाव होता असा आरोप ही बावनकुळे यांनी केला आहे.
ते म्हणाले की, शिवसेनेमधील 90 टक्के विद्यमान खासदार आणि आमदार नाराज आहेत. प्रताप सरनाईक यांचा लेटर बॉम्ब असो किंवा इतर नेत्यांची नाराजी हे त्याचेच उदाहरण आहे. विदर्भात येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे किती आमदार आणि खासदार निवडून येतात याच्यावरून हेच स्पष्ट होऊन जाईल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.