कला दिग्दर्शक राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी राकेश मौर्य याला गजाआड करण्यात यश आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून मौर्यला अटक केली. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा पदाधिकारी आहे. अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.
कला दिग्दर्शक राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं होतं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे पदाधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली होती. त्यादिवसापासून राकेश मौर्य फरार होता.
दोन जुलैपासून पोलीस राकेश मौर्यच्या मागावर होते. मात्र, तो सापडत नव्हता. आज (गुरुवारी) तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती लागला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून मौर्यला अटक केली आहे. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा पदाधिकारी असून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.
राजू सापते हे अत्यंत मनमिळावू कलादिग्दर्शक होते. गेल्या 22 वर्षांपासून राजू या विश्वात आपलं काम करत आहेत. अत्यंत शांत मनमिळावू स्वभावामुळे राजू यांच्याकडे काम पुन्हा पुन्हा येत असत. लॉकडाऊन नंतरच्या काळात राजू यांच्याकडे तब्बल पाच मालिकांचे काम होतं. परंतु युनियनच्या दहशतीमुळे त्यातलं एक काम आपण सोडून दिल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, गेल्य काही दिवसांपासून मला राकेश मौर्य वारंवार पैशावरून त्रास देत आहेत. मी काही कामगारांचे पैसे देणे लागतो असं सांगून मला त्रास दिला जातोय. वास्तविक मी सर्वांचे पैसे वेळेवर दिेले आहेत.