आज दि.१५ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

दुर्दैवाने आपण करोनाच्या तिसऱ्या
लाटेच्या पहिल्या टप्प्यावर

जगभरात अजूनही करोना ठाण मांडून बसला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांनी म्हटलं आहे. एकीकडे काही देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला असताना अनेक देशांमध्ये लसींचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात Delta Variant नं १११ देशांमध्ये आपले हातपाय पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार? या प्रश्नावर WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी उत्तर दिलं आहे. आणि ते सगळ्यांचीच काळजी वाढवणारं आहे. दुर्दैवाने आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत”, असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.

इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल
१६ जुलै रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा करोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.

कॉंग्रेसमधील कलहाच्या पार्श्वभूमीवर
कमलनाथ यांना मोठी जबाबदारी मिळू शकते

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले आहेत. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १० जनपथ येथे पोहोचल्या आहेत. या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कमलनाथ यांना मोठी जबाबदारी मिळू शकते तर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याविषयी बैठकीत चर्चा होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

यूजीसी अभ्यासक्रमामधून मुस्लीम
आक्रमाकांचा इतिहास वगळणार

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमामधून मुस्लीम आक्रमाकांचा इतिहास वगळण्याचा निर्णय़ घेतला आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या इतिहासामध्ये अकबर आणि मुघलांपेक्षा महाराणा राणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर भर दिला जाणार आहे.

ओबीसींच्या आरक्षणाप्रश्नी भुजबळ
भेटले देवेंद्र फडणवीस यांना

राज्यात ओबीसींचे स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत सार्वत्रिक नेतृत्व केले पाहिजे आणि आरक्षण टिकविले पाहीजे, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ओबीसींच्या स्थगित राजकीय आरक्षणाप्रश्नी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली व दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते.

भारतीय क्रिकेट संघाला फटका,
ऋषभ पंतला करोनाची लागण

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला करोनाचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घऱी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. करोनातून बरं झाल्यानंतर ऋषभ पंत पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान पंतशिवाय भारतीय संघ डरहॅममध्ये बायो बबलमध्ये परतला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे
कोल्हापूर जिल्हा त्रस्त

कोल्हापूर जिल्हा सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त आहे. रुग्ण संख्या आणि मृत्यूदरही वाढत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात आज दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पथकाची स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू आहे. नवे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय पथकासोबत होणारी ही पहिलीच बैठक आहे.

पेट्रोलच्या किमती नवीन पेट्रोलियम
मंत्री हरदीपसिंग पुरी करणार कमी

इंधनाचे दर भारतात उच्चांकी पातळी गाठत असताना देशाचे नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. या उद्देशाने त्यांनी तेल उत्पादक राष्ट्रांशी संपर्क साधण्यास सुरुवात केलीय. हरदीपसिंग पुरी यांनी कतारच्या ऊर्जामंत्र्यांना फोन केला आणि अमिरातीचे सुलतान अहमद अल जाबेर यांच्याशी चर्चा केली. पुरी यांनी ट्विटरवर लिहिले की, “ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा पुरवठा करणाऱ्यांना स्थिरता, निश्चितता आणि व्यावहारिकता या भावनेसाठी यूएई आणि इतर मैत्रीपूर्ण देशांसमवेत काम करण्याची आमची इच्छा आहे.

अमिताभ बच्चन यांच्या
बंगल्याबाहेर पोस्टरबाजी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेर मनसेने पोस्टरबाजी केली आहे. अमिताभ बच्चन यांचा जुहू चौपाटी या ठिकाणी असलेला प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांनी प्रतिक्षा बंगल्यावर पोस्टरबाजी केली आहे. मनसेने प्रतिक्षा बंगल्यासमोर काही बॅनर लावले आहेत. त्यात त्यांनी बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, असा मजकूर लिहिला आहे.

दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात
प्रवेश देणार : आरोग्य मंत्री टोपे

बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं टोपे म्हणाले.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचे
वृत्त निराधार : शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं. स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे.

10 ऑगस्टला देशभरात
बत्ती गुल होण्याची शक्यता

10 ऑगस्ट रोजी देशभरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सरकारचा निर्णय याला कारणीभूत ठरू शकतो. वास्तविक संसदेच्या आगामी अधिवेशनात सरकार वीज दुरुस्ती विधेयक सादर करणार आहे, ज्यास विरोध केला जात आहे. 10 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनने (एआयपीईएफ) प्रस्तावित सुधारित विधेयकाविरुद्ध कामावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. या एकदिवसीय कार्य बहिष्कारामध्ये फेडरेशनचे कर्मचारी आणि विद्युत अभियंते सहभागी होणार आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.