भाजप नेत्या पंकजा मुंडे या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरुन राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं होते. त्यावरुन शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडेंना थेट शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे.
पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल, असेही शंभुराज देसाई म्हणाले. ते बीड जिल्हा दौऱ्यावर असताना याबाबतचे वक्तव्य केले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं होते. या पार्श्वभूमीवर खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”