येत्या 1 जूनपासून असे 5 मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. नवीन महिन्यासह काही आर्थिक बदल देखील होत आहेत. यामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल, बँक बचत आणि एफडी खात्यावरील व्याजदर यांचा समावेश असू शकतो.
1 जूनपासून असेच पाच बदल होणार आहेत. यामध्ये गोल्ड हॉलमार्किंग , एसबीआय गृह कर्ज , अॕक्सिस बँक बचत खाते नियम , मोटार विमा प्रीमियम आणि एलपीजी गॅस सिलिंडरची अपेक्षित किंमत समाविष्ट आहे.
तुम्ही SBI कडून गृहकर्ज घेतले असेल, तर 1 जूनपासून तुमच्या खिशावर अतिरिक्त व्याजदराचा भार पडणार आहे. जर तुम्ही बँकेकडून नवीन कर्ज घेणार असाल, तर व्याजदर बदलले आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार घर घेण्यासाठी तुमची बँक निवडा. SBI ने एक्सटर्नल बेंचमार्क कर्ज दरात 40 बेस पॉइंट्स किंवा 0.40 टक्के वाढ केली आहे. आता तो 7.05 टक्के झाला आहे.
मोटर विमा प्रीमियम
तुमचा मोटार विम्याचा हप्ता आता महाग होणार आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे की 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम आता 2,094 रुपये असेल, जो कोविड-19 महामारीपूर्वी 2,072 रुपये होता. याशिवाय 1,000 सीसी ते 1500 सीसी इंजिन असलेल्या कारसाठी विमा प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा
सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होणार आहे. आता 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे होती. आता एकूण 288 जिल्ह्यांमध्ये केवळ 20 ते 24 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोने विकले जाईल.
अॕक्सिस बँक बचत खाते
अॕक्सिस बँकेने बचत खात्यांच्या सेवेवरील शुल्कात वाढ केली आहे. हेही 1 जूनपासून लागू होणार आहे. यामध्ये बचत खाती राखण्यासाठी आकारले जाणारे सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे. यासोबतच अतिरिक्त चेकबुकचे शुल्कही आकारण्यात येणार आहे.
गॅस सिलेंडरची किंमत
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही गॅसच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 3.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.