आज रविवार आहे. रविवार असला तरी आज रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
आज पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
रेल्वेनं आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉकची घोषणा केली आहे. मेगाब्लॉकच्या काळात रेल्वेच्या वाहतुकीत बदल होणार आहे. याकाळात सर्वसाधारणपणे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीचं काम चालेल.
पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
शनिवारी रात्रीपासून पश्चिम मार्गावर ब्लॉकला सुरुवात झाली आहे. बोरीवली ते कांदिवली स्थानकादरम्यान, अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ब्लॉक आहे. हा ब्लॉक रविवारी दुपारी दीड वाजता संपेल. पश्चिम मार्गावर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकदरम्यान सर्व गाड्या स्लो ट्रॅकवरुन चालवण्यात येतील.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
आज मध्य रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या मार्गावर हे काम करण्यात येणार आहे. सकाळी 10.55 मिनिटांनी हा ब्लॉक सुरु होणार आहे. दुपारी 3.55 मिनिटांपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक काळात देखभाल दुरुस्तीचं काम चालेल.
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर चुनाभट्टी आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतची लोकलसेवा पूर्णपणे बंद असणार आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत हार्बर लाईनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे या मार्गावर देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाईल. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.