भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाच्या यशस्वी कारकीर्दीची मंगळवारी अपयशी अखेर झाली. कारकीर्दीतील अखेरच्या स्पर्धेत खेळणाऱ्या सानियाला दुबई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
सानिया या स्पर्धेत अमेरिकेच्या मॅडिसन किजच्या साथीने खेळली. सानिया-मॅडिसनन जोडीला रशियाच्या व्हर्नोकिया कुडेरमेटोव्हा-ल्युडमिला सॅम्सोनोव्हा जोडीकडून सरळ सेटमध्ये ४-६, ०-६ अशी हार पत्करावी लागली.
जागतिक टेनिसमध्ये आपल्या यशस्वी कामगिरीने स्वत:चे आणि भारताचे नाव उंचवणाऱ्या ३६ वर्षीय सानियाने २००३ मध्ये व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिला सहा ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवण्यात यश आले. यामध्ये मार्टिना िहगिसच्या साथीने महिला दुहेरीतील तीन जेतेपदांचा समावेश आहे. मिश्र दुहेरीत सानियाने महेश भूपतीच्या (२००९ ऑस्ट्रेलियन, २०१२ फ्रेंच) साथीने दोन, तर अमेरिकन स्पर्धेतील एक विजेतेपद ब्रुनो सोआरेसच्या साथीत मिळवले.
‘‘माझ्या आयुष्यात टेनिसला खूप महत्त्वाचे स्थान आहे, पण टेनिस माझे पूर्ण आयुष्य नाही. टेनिस खेळायला सुरुवात केल्यापासूनच माझी ही धारणा होती आणि आजही आहे,’’ असे अंतिम सामना खेळण्यापूर्वी सानिया म्हणाली होती.
सानियाची दुहेरी कारकीर्द
* ५३१ लढतीत २४२ विजय
* ४३ विजेतीपदे
* १३ एप्रिल २०१५ मध्ये क्रमवारीत अव्वल
* सहा ग्रँडस्लॅम विजेतीपदे (महिला आणि मिश्र दुहेरीत प्रत्येकी तीन)