आता बिनधास्त बनवा मराठी सिनेमा! शिंदे-फडणवीस सरकार घेणार जबाबदारी
मराठी सिनेसृष्टीला आणि मराठी सिने निर्मात्यांना येणाऱ्या काळात अच्छे दिन पाहायला मिळणार आहेत. मराठी सिने-दिग्दर्शक आणि निर्मांत्यांना आता बिनधास्त मराठी सिनेमे तयार करता येणार आहेत. कारण मराठी सिनेसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभाग फिल्म बाजार ही ऑनलाईन वेब साईट तयार करणार आहे. या फिल्म बाजार वेब साईटसाठी एका विशेष समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत अभिनेता स्वप्निल जोशी आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारेंचीही निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक संजय जाधव,निर्माते केतन मारू यांचाही समितीत समावेश आहे. तसंच भाजप चित्रपट युनियनचे प्रमुख संदीप घुगेही समितीमध्ये असणार आहे.
फिल्म बाझार या वेब साईटच्या माध्यमातून सिनेमा, मालिका आणि ओटीटी वरील कार्यक्रमांच्या विकासासाठी मोठी मदत केली जाणार आहे. राज्यातील स्वातंत्र्यसेनानी समाजसुधारक, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची निर्मिती करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या स्टार महिला क्रिकेटरकडे यूपी वॉरीअर्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी
पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने महिला खेळाडूंना देखील क्रिकेटमध्ये विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी याकरता बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. 4 मार्च पासून या महिला आयपीएलला सुरुवात होणार असून याकरता लिलाव प्रक्रिया 13 मार्च रोजी पारपडली. या लिलावात स्टार महिला क्रिकेटर्सना आपल्या संघात घेण्यासाठी त्यांवर फ्रँचायझींनी कोट्यवधींची बोली लावली. अशातच महिला प्रीमियर लिग महिन्याभरावर आली असताना यूपी वॉररिअर्स या संघाने त्यांच्या महिला कर्णधाराची घोषणा केली आहे.
यूपी वॉररिअर्सने आपल्या संघाचे कर्णधारपद हे ऑस्ट्रेलियाची स्टार विकेटकिपर आणि फलंदाज एलिसा हीली हिच्याकडे सोपवले आहे. एलिसा हीली ही फार अनुभवी क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियासाठी 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांसह जवळपास 2,500 धावा केल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 110 खेळाडूंना बाद करणाऱ्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत देखील ती आहे.
मुंबईची हवा होतेय अधिक विषारी! प्रदूषणामुळे होत आहेत हजारो मृत्यू
2023 मध्ये महाराष्ट्रातील एरोसोल प्रदूषणाची पातळी आणखी वाढेल. त्यामुळे महाराष्ट्रातील हवा ‘अत्यंत असुरक्षित’ असलेल्या ‘रेड झोन’ या श्रेणीमध्ये येण्याची शक्यता आहे, असं गेल्या वर्षी झालेल्या एका रिसर्चमध्ये समोर आलं होतं. हा अंदाज खरा होताना दिसत आहे. राज्यातील हवेची गुणवत्ता खालावताना दिसत आहे. विशेषत: राजधानी मुंबईमधील हवा आरोग्याच्या दृष्टीनं घातक होत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षांत ब्राँकायटिस, दमा आणि न्यूमोनियामुळे 13 हजार 444 नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजे या आजारांमुळे दररोज सात जणांचा मृत्यू होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2017 ते 2021 दरम्यान, शहरात न्यूमोनियामुळे सात हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील हवा दिवसेंदिवस जास्त विषारी होत असल्याचं हे लक्षण आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ठाकरे गटाला धक्का, सुप्रीम कोर्टाने ‘त्या’ निर्णयासाठी दिला नकार
शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह ठाकरे गटाच्या ताब्यातून गेले असून शिंदे गटाला मिळालं आहे. पण, निवडणूक आगोयाच्या निर्णयावर धाव घेतल्यानंतरही ठाकरे गटाला धक्का बसला आहे. संपत्ती आणि मालमत्तेवर टाच आणू नये म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगितीची मागणी ठाकरे गटाने कोर्टात केली पण सरन्यायाधीशांनी स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र कोर्टाने याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिला आहे. तसंच, ठाकरे गट, शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार सुनावणी झाली. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.
पुस्तकातला सचिन प्रत्यक्षात, चंद्रपूरातील ZP च्या शाळेत अचानक अवतरला मास्टर ब्लास्टर
क्रिकेटचा देव म्हटला जाणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर अचानक आपल्या समोर येऊन उभा ठाकला तर काय होईल? बराच वेळ आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास नाही बसणार. अशीच काहीशी अवस्था चंदपूरच्या चिमूरमधील अलिझंझा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची झाली. त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ज्याला आतापर्यंत फक्त टीव्हीवर आणि पाठ्यपुस्तकातील धड्यात बघितलं, तो त्यांचा आवडता खेळाडू चक्क त्यांच्या समोर उभा होता.
इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे. या धड्यातील नायक सचिनने साक्षात अलिझंझाच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी हितगूज केल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
“राजकारणसुद्धा देशसेवाच, मी राजकारणात प्रवेश..”, समीर वानखेडेंनी सांगलीत व्यक्त केले मत
“राजकारणसुद्धा एक प्रकाराची देशसेवाच आहे, मात्र मी राजकारणात प्रवेश करेन की नाही, हे आताच सांगता येणार नाही,” असे मत महसूल सेवेतील सनदी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सांगलीमध्ये युवा शिवप्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वानखेडे म्हणाले, मला देशाची सेवा करायची आहे, मग ती कोणत्याही स्वरुपात असली तरी चालेल, राजकारण हीसुद्धा एक प्रकारे देशसेवाच आहे. मात्र, मी राजकारणात येईन की नाही, हे आताच सांगता येणार नाही. मुंबईतील कारवाईदरम्यान, राजकीय क्षेत्रातून आरोप झालेत. या संकट काळामध्ये मी केवळ छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, बाजीप्रभू देशपांडे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच स्मरण करीत राहिलो. यामुळे भीती वाटली नाही. मी फक्त संविधान आणि कायदे मानतो, मधला काळ हा माझ्या सेवेमधील संघर्षाचा काळ होता, असे ते म्हणाले.
सांगली : मिरजेत शुक्रवारपासून दोन दिवसीय कामगार साहित्य संमेलन
लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार साहित्य संंमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख कार्यवाह कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. तब्बल बारा वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत असून, यासाठी तीन हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, यानंतर विंदा बालमंच, डॉ. शंकरराव खरात ग्रंथ दालन, लोकशाहीर पठ्ठे बापूराव काव्य भिंतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या शैली ओबेरॉय; भाजपाच्या रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव
दिल्ली महापौर पदासाठी आज अखेर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला. शैली ओबेरॉय या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६ च्या नगरसेविका आहेत.
‘धोनी की पाठशाला’मध्ये माही बनला ‘गुरु’; अंडर-19 महिला क्रिकेट संघाला दिल्या महत्वाच्या टिप्स
एखाद्या खेळाडूने क्रिकेटच्या खेळाला ‘ब्रेन गेम’ बनवले असेल, तर त्या क्रिकेटपटूचे नाव महेंद्रसिंग धोनी आहे, असे मानले जाते. कॅप्टन कूल या नावाने जगात आपला ठसा उमटवणारा महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या टिप्स देऊन धोनी यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक जिंकणाऱ्या 19 वर्षांखालील भारतीय महिला संघासोबत महेंद्रसिंग धोनीचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याचे नाव “क्रिकेट क्लिनिक: एमएसडी” असे दिले गेले. या कार्यशाळेत क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेल्या महेंद्रसिंग धोनीने अंडर-19 महिला खेळाडूंना फिटनेस, गेम प्लॅन तयार करणे, दबावाखाली चांगले खेळणे यासह अनेक महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
SD Social Media
9850 60 3590