शिवसेना आणि ठाकरे गटात नवनव्या मुद्यावरून संघर्ष वाढत चाललाय. यात आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणाची भर पडलीय. मातोश्रीच्या देवघरातील धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता, असा दावा शीतल म्हात्रेंनी केलाय. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत त्यांच्या देवघरातील धनुष्यबाण दाखवला होता.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या धनुष्यबाणाची पूजा करायचे तो धनुष्यबाण पत्रकार परिषदेत दाखवला होता. उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या धनुष्यबाणावर कुंकूही दिसत होतं.
उद्धव ठाकरे काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं म्हणत असले तरी आता त्यांची काळजी वाढलीय. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एकनाथ शिंदेंनीच धनुष्यबाण दिला होता. आणि त्याचीच पूजा बाळासाहेब ठाकरे करत होते, अशी माहिती शीतल म्हात्रेंनी दिली.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हा धनुष्यबाण तुम्हीच बाळासाहेबांना दिला होतात का? याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही, अशी हात जोडत प्रतिक्रिया दिली आहे.