पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मोदींनी धुळीस मिळवली : नाना पटोले

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही. त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. परंतु सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली. देशाचा पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचं पद आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, असा घणाघात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. शिरपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

‘मोदी सरकारने कोरोना संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहिम फसली आहे परंतु प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढले आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसे काय काढले जाऊ शकते?’, असा सवाल पटोले यांनी केलाय.

त्याचबरोबर मोदी सरकार हे सामान्य लोकांचे, शेतकरी, कष्टकरी लोकांचे सरकार नाही. जनता महागाईत होरपळत आहे. शेजारच्या श्रीलंका, भूतान, नेपाळमध्ये पेट्रोल 60-65 रुपये लिटर आहे. आपल्याला मात्र त्यासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. भरमसाठ कराच्या रुपाने मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केलाय.

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षातील अनेक आजी-माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले ते भाजपात गेले असले तरी मनाने ते काँग्रेसचे आहेत त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत असल्याचा दावा पटोले यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.