पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना नियंत्रणासाठी नाशिकमध्ये ब्रेक द चेनच्या निर्बंधांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं म्हटलंय. तसेच कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्याचा कोरोना सद्यस्थितीचा घेतला आढावा त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत नाशिक शहर व जिल्हा कोरोना विषाणू आणि कोरोना पश्चात आजारांबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट संपली असली तरी कोरोना नवीन डेल्टा प्लस या विषाणूच्या रूपाने आव्हान बनुन आपल्या समोर उभा ठाकला आहे. यादृष्टिने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व नवीन डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता जास्त असल्याने नागरिकांनी स्वत: काळजी घेवून कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यानुसार कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभिर्य लक्षात नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसुत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, जेणेकरून डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूचा सामना आपण सर्व एकत्रितपणे करू शकतो, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात या विषाणूंच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे कडक संचारबंदीचे नागरिकांनी पालन करण्यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच डेल्टा प्लस या विषाणूचा फैलाव हा गर्दीच्या ठिकाणी अधिक होत असल्याने पर्यटनस्थळी व इतर ठिकाणी देखील विनाकारण गर्दी टाळण्याची दक्षता नागरिकांनी घेवून संपूर्ण जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले आहे.