बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेदरम्यान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. खडसे, पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर आता जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडीत एका व्यासपीठावर आले खरे, मात्र बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान खडसे व पाटील यांच्यात आरोप – प्रत्यारोपाचे राजकारण रंगले. या दोन नेत्यानंतर आता त्यांच्या समर्थकांमध्ये देखील जुंपल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेच अवैध धंदे सूर असल्याचे म्हटले आहे.
बोदवड निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेत एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली होती. जे अनेक वर्ष आमदार राहिले आहेत, जे मंत्री राहिले आहेत, त्यांनी पाहावे माझ्या मतदाससंघातील रस्ते कसे हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत असल्याचे पाटील यांनी म्हटले होते. असं म्हणत पाटील यांनी खडसेंना टोला लगावला होता. तर दुसरीकडे खडसे यांनी देखील आपल्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर गुलाबराव पाटलांना आपल्या वक्तव्यावरून माफी मागावी लागली होती.