आजच्या काळात प्रत्येक जण मोबाइलमध्ये व्यग्र असल्याचं आपण पाहतो. सभोवतालचं जीवन पाहण्यापेक्षा लोक मोबाइल पाहण्यात जास्त दंग असतात. आपलं आयुष्य व्यापून टाकलेल्या या मोबाइलचा शोध लावण्याचं श्रेय मार्टिन कूपर यांना जातं. त्यांनी 1973 मध्ये मोबाईलचा शोध लावला.
लोकांनी मोबाइलचा कमी प्रमाणात वापर करावा, अशी विनंती त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केली आहे. मार्टिन यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जी वस्तू मार्टिन यांनी स्वतः बनवली, त्या वस्तूचा वापर कमी करण्याची विनंती ते लोकांना का करत आहेत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अर्थात त्यामागे असलेली मार्टिन कूपर यांची भूमिका विचारात घेण्यासारखी आहे.
`बीबीसी`च्या नुकत्याच झालेल्या एका चॅट शोमध्ये मार्टिन कूपर सहभागी झाले होते. त्या वेळी संशोधक आणि अभियंता मार्टिन यांनी सांगितलं, की ते 24 तासांमध्ये केवळ पाच टक्के वेळ मोबाइल मध्ये वेळ घालवतात. मूळचे शिकागो इथले रहिवासी असलेल्या मार्टिन यांना जेव्हा या मुलाखतीत विचारण्यात आलं, की जे लोक आपला बहुतांश वेळ मोबाइल पाहण्यात घालवतात त्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? त्यावर मार्टिन म्हणाले, की `खरंतर, लोकांनी मोबाइल बंद करून थोडंसं आयुष्य जगलं पाहिजे.`
स्वतंत्र मोबाइल क्रमांकाची आणली संकल्पना
70चं दशक मोबाइल जगतासाठी खूप क्रांतिकारी ठरलं. त्या वेळी कारच्या बॅटरीवर चालणारे फोन बसवले जात होते; पण त्याच वेळी मार्टिन यांनी पोर्टेबल फोन बाजारात आणला. त्याला वायरची गरज नव्हती. याशिवाय प्रत्येकाला वेगवेगळे फोन क्रमांक देण्याची कल्पना त्यांचीच होती. यासोबतच मार्टिन यांनी टॉवरच्या माध्यमातून सेल फोन चालवण्याची संकल्पनाही आणली.
मोबाइल चार्ज होण्यासाठी लागत होते 10 तास
मार्टिन यांनी तयार केलेला पहिला मोबाइल फोन सध्या उपलब्ध असलेल्या मोबाइल फोनपेक्षा खूप वेगळा होता. त्या फोनची बॅटरी 25 मिनिटं चालत असे. तसंच तो फोन चार्ज करण्यासाठी 10 तास लागायचे. पहिला फोन वजनानंदेखील जड होता. या फोनचं वजन एक किलो 13 ग्रॅम होतं. तसंच त्याची लांबी दहा इंच होती. सध्याच्या काळात मोबाइलमुळे लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. लोक आपला बहुतांश वेळ मोबाइलमध्येच घालवतात, असं पन्नास वर्षांनंतर मार्टिन यांना वाटतं. `लोकांनी मोबाइलचा वापर कमी करावा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा,` असा सल्ला मार्टिन कूपर देतात.