शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. पण यावेळी त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. “उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहे. आम्ही त्यांच्यावर काही बोलणार नाही. योग्य वेळ आली तेव्हा उत्तर देऊ. आम्ही शिवसेनेत आहोत. आमचे मुख्यमंत्री शिवसैनिक आहेत. शाखाप्रमुख आज मुख्यमंत्री झाला आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवी मुख्यमंत्री असतील असं म्हणत मोठा राजकीय बॉम्ब फोडला. भाजपच्या हायकमांडने याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होणार याबाबतची माहिती गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनादेखील नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली तेव्हा त्यांनादेखील आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ देखील समोर आला होता. पण या व्हिडीओवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या जल्लोषाचे व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केली जातेय, असं दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गोव्यात आमदारांनी जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली जात आहे. ती आमदारांचा तणाव कमी झाल्याने नैसर्गिक प्रतिक्रिया होती, असं दीपक केसरकर म्हणाले. तसेच आता इथून पुढे कसे वागायचे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
“सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हाव, अशी आमची इच्छा होती. पण होतील असं वाटत नव्हतं. शिंदेंनी मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मोठं मन दाखवलं”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“जलयुक्त शिवारचे पुनर्जीवन फडणवीस यांनी केले. ओबीसी आरक्षणाबाबत सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांमुळे ग्रामीण आणि शहर जोडलेली. तुमच्या पैकी प्रत्येक जण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आहे”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. एकनाथ शिंदेंना बुद्धिमान देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. काम करणाऱ्या माणसाला बुद्धिमान माणसाची साथ मिळत आहे, असंदेखील केसरकर यावेळी म्हणाले.