केवळ लग्नासाठी हिंदूंकडून धर्मांतर होत आहे. अत्यंत छोट्या स्वार्थासाठी हिंदू दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्याची चूक करत आहे. हिंदू कुटुंबीयांकडून मुलांना धर्म आणि त्याच्या परंपरेचे संस्कार दिले जात नाहीत म्हणून अशा घटना घडत आहेत, असं सांगतानाच OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
मोहन भागवत उत्तराखंडच्या हल्दानी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. धर्मांतर कसं होतं? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, विवाह करण्यासाठी, आपल्या देशातील मुलं आणि मुली धर्मांतर का करत आहेत? धर्मांतर करणारे चुकीचे आहेत तर हरकत नाही. पण आपल्या मुलांना आपण वाढवत नाही का?, असा सवाल भागवत यांनी केला.
हिंदू मुलांचं धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी मुलांच्या व्यवहारावर भाष्य केलं. आपल्याला मुलांना घरातच संस्कार द्यावे लागतील. स्वत:चा अभिमान वाटावा, आपल्या धर्मावर अभिमान वाटावा आणि आपल्या प्रार्थना आणि परंपरांबद्दल आदर वाटावा असे संस्कार मुलांना द्यावे लागतील. त्याबाबत मुलांनी सवाल केले तर त्यांना उत्तरे द्या. कन्फ्यूज होऊ नका, असं त्यांनी सांगितलं.
अनेक राज्यात लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदे आणण्यात आले आहेत. अशावेळी भागवत यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे. संघाच्या दबावाखालीच हे कायदे करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी कौटुंबीक मूल्य आणि त्याच्या संरक्षणावर विस्तृतपणे मांडणी केली. यावेळी त्यांनी संघात अधिक पुरुषच का आहेत हे सुद्धा सांगितलं. हिंदू समाजाला संघटीत करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे. परंतु, जेव्हा आपण कार्यक्रमांचं आयोजन करतो तेव्हा कार्यक्रमात पुरुषच दिसतात. आता जर आपण संपूर्ण समाजाला संघटीत करणार आहोत, तर आपल्या कार्यक्रमांना 50 टक्के महिला उपस्थित असल्या पाहिजेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी ओटीटीवरून पालकांना सावध केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. हे कंटेट दाखवताना मुलांवर काय परिणाम होईल, आपली परंपरा, संस्कार आणि मूल्यांचं काय होईल याचं ओटीटीला काहीही पडलेलं नसतं. त्यामुळे घरी काय पाहावं आणि काय पाहू नये हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भारतीय कुटुंब पद्धतीचं कौतुक केलं. आता पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब पद्धतीचा अभ्यास करत आहे. अर्थात पूर्वी हीच व्यवस्था आणि मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांना गुलाम करण्यासाठी पश्चिमात्यांनी चीनला अफू पाठवली. तरुणाना अफूची सवय लागली. पिढी बरबाद झाली आणि पाश्चिमात्यांनी चीनवर राज्य केलं. आमच्या देशातही असंच होत आहे. ड्रग्ज कुठून येत आहे हे पाहिल्यावर तुम्हाला कळेल ड्रग्ज कुठून येतं आणि त्याचा कुणाला फायदा होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.