१६ जानेवारी ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप
दिवस’; पंतप्रधानांची घोषणा
देशातल्या स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत, त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील १५० स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला.
देशभरात मागील २४ तासात २ लाख
नवीन करोनाबाधित आढळले
एककीकडे करोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं असताना, दुसरीकडे करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग देखील वाढत आहे. देशभरात मागील २४ तासात २ लाख ६८ हजार ८३३ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. ही संख्या काल आढळलेल्या करोना बाधितांपेक्षा ४ हजार ६३१ रूग्णांनी जास्त आहे. याशिवाय याच कालावधीत १ लाख २२ हजार ६८४ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना
गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय, योगी हे यंदा अयोध्या किंवा मथुरा मधून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा देखील सुरू होती. अखेर ही चर्चा आज थांबली आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपाने गोरखपूर(शहर) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, गोरखपूर येथून उमेदवारी जाहीर झाली आहे.
५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर
जोगींदर मान आम आदमी पक्षात
तब्बल ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. जोगींदर मान असं या नेत्याचं नाव आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जोगींदर मान यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या एका दिवसानंतर शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी पक्षाशी असलेले त्यांचे ५० वर्षांचे संबंध तोडले आहेत.
शरद पवार यांच्या विषयी नव्या
पिढीने तारतम्याने बोलावे : अजित पवार
भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून टीका केली. फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध
कसोटी मालिका जिंकली
दक्षिण आफ्रिकेने पिछाडीवरून येऊन भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या-वहिल्या मालिका विजयाचे विराट कोहलीचे स्वप्न साकारत असतानाच भंगले. कधी नव्हे, ती यंदा आपल्याला दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात होते.
बिपीन रावत यांच्या मृत्यूचे
कारण खराब हवामान
काही दिवसांपूर्वीच सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आता समोर आले आहे. IAF ने म्हटले आहे की 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर अपघाताच्या तपासात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले. हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे यांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे कारण नसल्याचे त्यात म्हटले आहे. प्राथमिक अहवालानुसार, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाला, हेलिकॉप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. ढगांमुळे वैमानिक गोंधळला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊन आदळले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन,
1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
संसदेचं बजेट सत्र 31 जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. 31 जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 12 मार्चला सुरु होणार आहे. तर, 8 एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होईल. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील, अशी माहिती आहे.
नंदुरबार मध्ये तलाठ्याच्या
अंगावर घातला ट्रॅक्टर
नंदुरबारमध्ये काळजाचा ठोका चुकवणारे थरारनाट्य घडले. वाळू तस्करांनी चक्क मंडळ अधिकारी आणि तलाठाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे महसूल विभागाचे धाबे दणाणले आहे. अशा गुन्हेगारी व्यक्तींवर कारवाया करायच्या तरी कशा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही राज्यात वाळू तस्कारांविरोधात कारवाई करायला गेल्यानंतर तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर आणि इतर वाहने घालण्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वाळू तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
SD social media
9850 60 35 90