लसीकरणाला सरसकट परवानगी द्यायला हवी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीकरणासंदर्भात मोठी मागणी केली आहे. लसीकरणाला वयाचं बंधन नसावं असं राज यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.
राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना इतर ट्रायलमधील लसींना केंद्र सरकारने परवानगी द्यावी का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी मला लसीसंदर्भातील तांत्रिक गोष्टी ठाऊक नसल्याचं सांगितलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी, मला तांत्रिक गोष्टी ठाऊक नसल्याने मी केंद्राने लसींना परवानगी का दिली किंवा दिली नाही हे मला ठाऊक नाही असं म्हटलं. मात्र लसीकरणाला वयोमर्यादा नसावी असं स्पष्ट मत राज यांनी यावेळी व्यक्त केलं.
सध्या आरोग्य हा राज्य सरकारचा नाही देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आणि उद्या तिकडे असेल. त्यामुळेच राज्य सरकारांनी आणि केंद्राने आरोग्य या विषयासंदर्भात गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक गोष्टींसाठी काय तरतूद केली आहे यासंदर्भातही सरकारांनी आढावा घेणं गरजेचं असल्याचं मत राज यांनी व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनीही केलीय वयोमर्यादेसंदर्भातील मागणी…
करोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, आता या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जावी अशी मागणी केली होती, ती पंतप्रधान मोदींनी मान्य केली होती.
…म्हणून मी घेतली पत्रकार परिषद : राज ठाकरे
“काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
राज यांनी काय मागण्या केल्या ?
“शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का ? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा,” अशा मागण्या केली असल्याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.