उत्तर प्रदेशची जनता १० मार्चला
उत्तर देईल : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे जाहीर सभेला संबोधित केले. ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात उत्तर प्रदेशात सण रोखले, त्यांना उत्तर प्रदेशची जनता १० मार्चला उत्तर देईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. अनेक दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा झाली आहे. आज मी याचा उल्लेख करत आहे कारण काही राजकीय पक्षांनी अशा दहशतवाद्यांवर मेहरबानी केली आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिले तेलंगणच्या
मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत येत आहेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होणार आहे. शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून भेटीला येण्याचे निमंत्रण दिले होते.
रिलायन्स कॅपिटलची
विक्री प्रक्रिया सुरू
अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलची विक्री प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या अंतर्गत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केले आहे. त्यामुळे लवकरच रिलायन्स कॅपिटल कंपनीचा लिलाव होऊन ती विकली जाणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या मते, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करण्याची शेवटची तारीख 11 मार्च आहे. त्याच वेळी, रिलायन्स कॅपिटलचा रिझोल्यूशन प्लॅन सबमिट करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे.
शिक्षक भरती प्रकरणात
शिक्षकच झाला एजंट
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नाशिक आणि पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आले आहे. उमेदवारांकडून पैसे घेऊन अधिकाऱ्यांना पुरवल्याचं उघड झाले आहे. यात एक सब एजंटचा समावेश आहे. हा एजंट दुसरा कोणी नाही तर एक शिक्षक आहे. मुकुंद सूर्यवंशी, असे या अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. वरिष्ठ लिपिक राजेंद्र साळुंके आणि दीपक भुसारी याला अटक केली.
समीर वानखेडे यांच्याविरोधात
फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती.
पैसे न मिळाल्यामुळे पाकिस्तान
सुपर लीगला जेम्स फॉकनरचा रामराम
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स फॉकनरने पैसे न मिळाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगला रामराम ठोकला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कराराची रक्कम न भरल्याने त्याने हा निर्णय घेतला. फॉकनर घरी परतण्यासाठी विमानतळावर जात असताना, तो खूप रागावलेला दिसला. तो इतका संतापला की त्याने विमानतळावर जाण्यापूर्वी लॉबीच्या बाल्कनीतून बॅट आणि हेल्मेट फेकले, जे झुंबरावर जाऊन अडकले. नुकसानग्रस्त झुंबराचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॉकनरने यापूर्वी पीसीबीवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्याने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले, ”मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो.”
आमदाराला मारहाण प्रकरणी
अधिकार्याने जवाब बदलला
इंदौरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी मारहाण केलेल्या पालिका अधिकाऱ्याने या प्रकरणात न्यायालयात सुनावणीदरम्यान आपला जबाब बदलला आहे. जून २०१९ मध्ये आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली होती. आता जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्याने आपला जबाब बदलला आहे. २०१९ मध्ये एका व्हिडिओमध्ये भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय हे बॅटने मारहाण करताना दिसत होते. आकाश हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजवर्गीय यांचे पुत्र आहेत. या प्रकरणानुसार, जीर्ण घरासह इतर घरे पाडण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी इंदूरच्या गंजी कंपाऊंडमध्ये पोहोचले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या 6 मार्चला पुणे दौऱ्यावर
आगामी महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असणार आहेत.
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा
आहे का? : याचिका दाखल
देशाची राष्ट्रभाषा हिंदीला दक्षिणेकडील राज्यांमधून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेतून हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हैदराबादमधील एका तेलगू भाषिक व्यक्तीने ही याचिका दाखल करून हिंदीला राष्ट्रभाषा मानण्यावर आक्षेप घेतला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने हिंदी हीच देशाची राष्ट्रभाषा असल्याचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.
SD social media
9850 60 35 90