‘राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, आता निकाराची लढाई आहे, हा माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या नावाचा उल्लेख आहे. पोलिसांनी आहेर यांना ताब्यात घेतलं. मात्र, आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पोलीस ठाण्याला घेराव घातला. यावेळी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
‘त्यांनी नताशाचं नाव घेतलं, माझ्या जावयाचं नाव घेतलं. अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलायचं, कोण बाबाजी आहे, त्यांच्या पैशाच्या व्यवहाराबद्दल बोलले आहे. इतके सगळे पुरावे असताना कायद्याचे सो कॉल्ड लोक कुठे आहे, गुरुवारी रात्री सुद्धा मुंब्य्रात आमच्या पदाधिकाऱ्याला फोन केला, आव्हाडांचा नंबर आहे असं अशी धमकी दिली आहे, असंही ऋता आव्हाड यांनी सांगितलं.
आयुक्त म्हणून त्यांची कारकिर्द कशी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ते ब्ल्यू बॉय कुणाचे आहे हे सर्वांना माहिती आहे. पोलिसांनी आता कारवाई करावी. नाहीतर आता आम्हाला न्यायालयामध्ये जावे लागणार आहे. तिथेच न्यायाची अपेक्षा आहे. आम्हाला सुरक्षा पुरवण्यापेक्षा यांची हिंमत कशी होते, त्यांच्याकडून कुणी बोलवून घेत आहे का? असा सवालही ऋता आव्हाड यांनी केला.