आता शंख फुंकावाच लागेल, भीमाशंकर प्रकरणी शिवसेनेचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उरफाटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल, असं म्हणत शिवसेनेनं शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आसाममधील भाजप सरकारने महाराष्ट्रातील एका ज्योतिर्लिंगावरच मालकी हक्काचा दावा ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे.

‘केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच ही लूट करीत आहेत. आता या ‘पळवापळवी’त आसाममधील भाजप सरकारची भर पडली आहे. या सरकारने महाराष्ट्रातील एका ज्योतिर्लिंगावरच मालकी हक्काचा दावा ठोकला आहे. सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे नसून आमचे आहे, असे आसाम सरकारने म्हटले आहे. हा महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार आहे. बरे, सहावे ज्योतिर्लिंग जर आसाममध्ये असल्याचा तुमचा दावा आहे तर मग ही उचकी तुम्हाला आताच का लागली? हा ‘साक्षात्कार’ तुम्हाला आधी का झाला नाही? आतापर्यंत असंख्य महाशिवरात्री आल्या आणि गेल्या. ना तुम्ही असा दावा केला ना त्याच्या पानभर जाहिराती छापल्या. मग आताच हा नसता उपद्व्याप आसामच्या भाजप सरकारने का केला? असा सवाल सेनेनं शिंदे गटाला केला आहे.

‘महाराष्ट्रातील सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे; कारण या सर्व फुटिरांना आधी गुजरातमधील सुरतमध्ये आणि नंतर आसाममधील गुवाहाटी येथे ‘राजाश्रय’ मिळाला होता. ‘काय झाडी, काय हाटील…’ अशी जंगी बडदास्त ठेवली गेली होती. तेथील मुक्कामापासून कामाख्या मंदिरातील ‘विधीं’पर्यंत आसाम सरकारने मिंधे गटाचा खास पाहुणचार केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही. ‘या पाहुणचाराच्या बदल्यातच भीमाशंकर ज्योतिर्लिंग तुम्ही त्यांना देऊन आला नाहीत ना?’ या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नालाही त्यांच्याकडे काय उत्तर आहे? असा टोला सेनेनं शिंदे गटाला लगावला.

मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांची ही अशी मनमानी बिनदिक्कतपणे सुरू आहे. महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे काही द्यायचे नाही, हक्काचे उद्योग, प्रकल्प इतर भाजप राज्यांत पळवून न्यायचे आणि येथील जनतेच्या प्रखर विरोधाकडे दुर्लक्ष करीत विनाशकारी ठरणारे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारायचे. देशाची ‘आर्थिक राजधानी’ हा मुंबईचा ‘मुकूट’ हिरावण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. मुंबईचे जागतिक वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेले ते त्यासाठीच. एका भाजपशासित राज्यात झालेली फिल्मसिटी उभारण्याची घोषणा बॉलीवूड मुंबईचे महत्त्व आणि जागतिक सिनेउद्योगाला असलेली मुंबईची झळाळी कमी करण्याचेच उद्योग आहेत. माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे, अशी टीकाही सेनेनं केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.