क्रोएशियाने ब्राझीलला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारली. ब्राझील बाहेर पडताच नेमारला अश्रू अनावर झाले होते. आता सेमीफायनलमध्ये क्रोएशियाला मेस्सीच्या अर्जेंटिनाचे आव्हान असणार आहे. क्रोएशियाचा संघ पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी लढत आहे. गेल्या वेळी क्रोएशियाला अंतिम सामन्यात फ्रान्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी क्रोएशिया मंगळवारी अर्जेंटिनाविरुद्ध मैदानात उतरेल. या सामन्यात सर्वांची नजर मेस्सीवर असणार आहे.
वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेस्सी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तर फ्रान्सकडून 2018 मध्ये अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलेल्या क्रोएशियाची नजर यंदा विजेतेपदावर असणार आहे. क्रोएशियाचा डिफेंडर जोसिप जुरानोविचने सांगितलं की, मला नाही वाटत की आम्हाला कोणत्या खेळाडुला घाबरण्याची गरज आहे. आम्हाला फक्त आमच्या सर्वोत्तम खेळावर लक्ष देण्याची गरज आहे.
क्रोएशियाने क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलला पेनल्टी शूटआऊटवर हरवलं होतं. तेव्हा नेमार ज्युनिअरला अश्रू रोखता आले नव्हते. अर्जेंटिनाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत पाच सामन्यात चार गोल केले आहेत. नेदरलँड विरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये केलेला गोल हा त्याच्या कौशल्याचा अद्भुत असा नमुना होता.
अर्जेंटीनाला तिसऱ्या आणि 1986 नंतर पहिल्या वर्ल्ड कप विजयाची प्रतिक्षा आहे. याची जबाबदारी मेस्सीने स्वत:च्या खांद्यावर घेतलीय. अर्जेंटिना 2015 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीकडून पराभूत झाला होता. मेस्सी वर्ल्ड कप विजेतेपदाच्या इतक्या जवळ पोहोचण्याची ही एकच संधी आतापर्यंत आली होती. त्यानतंर आता तो वर्ल्ड कपपासून दोन पावलेच दूर आहे.
क्रोएशियाचा स्ट्रायकर ब्रूनो पेटकोविचने म्हटलं की, “आम्ही लियोनेल मेस्सीसाठी अद्याप खास अशी व्यूहरचना आखलेली नाही. फक्त एका खेळाडुवर नाही तर संपूर्ण संघावर आम्ही लक्ष देतोय. याच पद्धतीने आम्हाला मैदानावर उतरून त्यांना रोखावं लागेल. फक्त एका खेळाडुवर लक्ष केंद्रीत करण्यापासून आम्हाला दूर रहायला हवं. अर्जेंटिना म्हणजे फक्त मेस्सी नाही.” क्रोएशियाच्या मिडफिल्डमध्ये रियल मद्रीदचा मिडफिल्डर लुका मॉड्रिच आहे. क्रोएशियाचे कोच जाल्को डालिच यांनी ब्राझीलचा पराभव केल्यानतंर आपली मीडफिल्ड ही जगातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं होतं. ब्राझीलविरुद्ध नेमारला रोखण्यात त्यांनीच महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.