शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली. २ डिसेंबरला ही धमकी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितलं. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. ‘सिल्वर ओक’मधील टेलिफोन ऑपरेटरने याप्रकरणी ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत; आमदार राजन साळवींची एसीबीकडून चौकशी
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी करण्यात आली आहे. बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांची चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर राजन साळवी चौकशीसाठी अलिबागच्या दिशेनं रवाना झाले.त्यांच्या चौकशीची माहिती समोर येताच राजन साळवी यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटले आहेत. रत्नागिरीत काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. आपल्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली आहे.मला बजावलेली नोटीस आयोग्य असून हे सर्व भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे, असा आरोप राजन साळवी यांनी केला आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे.
सातारा : मांढरदेव येथील काळूबाई मंदिरात दीड लाखांची चोरी
मांढरदेव येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांने रुपये दीड लाखाची रक्कम आणि सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे मांढरदेव येथे आणि काळेश्वरी भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा’ म्हणणारे काँग्रेस नेते राजा पटेरियांना अटक
काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी राजा पटेरियांना मध्य प्रदेशातील दामोह येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली आहे
कर्नाटकात जाण्याचा ठराव अंगाशी येणार? 11 गावांतील सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांना नोटीस
सुविधा मिळत नसल्याचे कारण देत कर्नाटक राज्यात जाण्याचा ठराव सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी केला होता. हा ठराव आता अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटकात जाण्याचा ठराव करणाऱ्या किंवा निवेदन देणाऱ्या 11 गावांना प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली असून 24 तासांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.सुविधा द्या नाहीतर कर्नाटक राज्यात सामील होण्याची परवानगी द्या, असे निवेदन सादर करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यातून सुटका करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कारवाईच्या भीतीने काही ग्रामसेवकांनी संबंधित बीडीओंना लेखी निवेदन देत सदर ठराव ग्रामसभा न घेताच संबंधित गावांच्या सरपंचांनी ग्रामपंचायत लेटरहेडवर स्वतःच गाव ठराव लिहून दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादात आता सरपंच आणि ग्रामसेवकांतच संघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
टीम इंडियातून डावललेल्या खेळाडूची शानदार खेळी, लगावले तब्बल सात षटकार
टीम इंडियातून बाहेर असलेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याच्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याबद्दल चाहते सतत आवाज उठवत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. दरम्यान संजू सॅमसनने रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम खेळी करुन सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.रणजी ट्रॉफीमध्ये मंगळवारी केरळ आणि झारखंड यांच्यात सामना झाला, येथे केरळने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार संजू सॅमसनने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. संजू सॅमसनने १०८ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली, ज्यात ४ चौकार आणि ७ षटकार लगावले.
SD Social Media
9850 60 3590