लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात योग्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा चेहरा नसल्यास २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत विजयी होण्याची शक्यता कमी असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले. “विरोधकांचा मजबूत चेहरा नसेल तर २०२४ मध्ये मोदींचा पराभव करणे कठीण होईल. पंतप्रधान मोदींविरूद्ध लढण्यासाठी सध्या विरोधी पक्षात कोणीही नाही. सर्व विरोधी पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी एक चेहरा आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि तो शोधण्याचा प्रयत्न करा” असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे खासदार म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने २०२४ मध्ये विरोधी पक्षाचा चेहरा होऊ शकतात. याआधीही संजय राऊत यांनी संयुक्त आघाडीसाठी विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून शरद पवार यांना उमेदवार करण्याची मागणी केली होती. “तुम्हाला जर देशातला विरोधी पक्ष बळकट करायचा असेल तर शरद पवारांसारख्या नेत्याला युपीएचा प्रमुख बनवायला हवं. त्यांचे नेतृत्व सर्वांना मान्य आहे,” असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी राज्यातील परिस्थितीबाबतही भाष्य केलं आहे. राज्यात नाना पटोलेंकडून स्वबळाची भाषा केली जात असताना विरोधी पक्षामध्ये फूट असेल तर आघाडी कशी काय जन्माला घालणार असे देखील म्हटले. “आपल्या देशामध्ये विरोधकांची एकजूट ही एक गहण समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्यातला विरोधी पक्ष स्वतःला बादशाहा मानतो. अशा मानसिकतेमध्ये सर्वांची एकजूट होणे ही जरी गरज असली तरी त्या एकजूटीला नेता असणे गरजेचे आहे. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जेव्हा विरोधी पक्षांचा पराभव केला तेव्हा विरोधी पक्षाला जबाबदार चेहरा मिळाला. याक्षणी असा चेहरा कोण आहे हे विरोधी पक्षांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्ष एकत्र यायला पाहिजे. विरोधी पक्षामध्ये फूट असेल तर आघाडी कशी काय जन्माला घालणार, असे संजय राऊत म्हणाले.