उच्च न्ययालयाकडून
अकरावीची सीईटी रद्द
इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. हा निर्णय म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही. अशाप्रकारचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे.
आयुर्वेद आणि योगशिक्षक
बालाजी तांबे यांचे निधन
आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. बालाजी तांबे यांनी ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुरवणीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जागृती केली. त्यातून त्यांनी विविध विषयांवर शेकडो लेख लिहीले.
धीरूभाई तुमचे गुडघे शाबूत
राहतील तर : बालाजी तांबे
सर्वच क्षेत्रामध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार होता. राजकीय क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांशी बालाजी तांबे यांचं अनोखं नातं होतं, तर दुसरीकडे भारतीय उद्योग विश्वातील मोठं नाव असलेल्या अंबानी उद्योग समूहाचे प्रमुख अर्थात धिरूभाई अंबानी यांच्याशी देखील त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. धिरुभाई अंबानी तर त्यांच्याकडे उपचार देखील घेत होते. वृत्तवाहिनीशी बोलताना बालाजी तांबे यांनी धिरूभाई अंबानींचा एक किस्सा सांगितला होता. तोपर्यंत तुमचे गुडघे शाबूत राहतील तर ठीक, असे धीरूभाईंना बालाजी तांबे म्हणाले होते.
जगासमोर एक नवीन संकट,
मारबर्ग विषाणूचा संसर्ग
जगभरामध्ये करोनाच्या साथीने थैमान घातलेलं असतानाच आता जगासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये घातक अशा मारबर्ग विषाणूचा संसर्ग झालेला पाहिला रुग्ण आढळून आला आहे. डब्लूएचओने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा विषाणू इबोला आणि करोनापेक्षाही घातक असल्याचं मानलं जात आहे. विषाणूचा संसर्ग प्राण्यांमधून होऊ शकतो. मारबर्गचा रुग्ण आढळल्याने गिनीमधील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
३० हजार करोना रुग्णसंख्या झाल्यास
तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास करोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे. याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून सखोल अभ्यास करून लवकरच अंतिम धोरण निश्चित केले जाणार असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईसह १२ शहरं पाण्याखाली
जाण्याचा धोका
तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. शतकाच्या अखेरीस ही शहरं ३ फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे. २००६ ते २०१८ या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे ३.७ मिलीमीटर दराने वाढत आहे.
श्रीवर्धन तालुक्यात माशासाठी
तब्बल दोन लाखांची बोली
श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात २२ किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल २ लाख ६१ हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झालेत. जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व नितीन पाटील हे समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. जाळी लावून बसले असतांना, जाळ्यात मोठा मासा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फक्त अकरा मिनिटे बलात्कार,
पाकिस्तान मध्ये केली शिक्षा कमी
पाकिस्तानच्या संसदेमध्ये देखील सर्व महिला खासदारांनी बलात्काऱ्यांना भरचौकात फाशी देण्याची शिक्षा देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आता एका स्थानिक न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयावरून स्वित्झर्लंडमध्ये वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे हा निर्णय एका महिला न्यायाधीशांनी दिला आहे. फक्त अकरा मिनिटं बलात्कार झाला म्हणून शिक्षा कमी केल्याची घटना येथे घडली आहे. मोठ्या संख्येने महिला या न्यायालयासमोर आंदोलन करत असून आरोपीची शिक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे. एपी न्यूजनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
तर काळजी घ्या, आयकर
विभाग देऊ शकतो नोटीस
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याशिवाय एटीएममधून पैसे काढण्याचे नियमही कडक करण्यात आलेत, जेणेकरून रोख रकमेचे व्यवहार कमी होतील. जर तुम्ही रोख रक्कम जास्त वापरत असाल तर काळजी घ्या. यात आम्ही तुम्हाला त्या रोख व्यवहारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची आयकर विभागाने दखल घेतली आहे. आपण चुकल्यास कर विभाग नोटीस जारी करू शकतो.
मुंबई परिसरात डिझेलची
होम डिलिव्हरी शक्य
आता इंडियन ऑईल कंपनीला मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात डिझेलची (Diesel) होम डिलिव्हरी करणे शक्य होईल. ही सेवा सुरु झाली असून ग्राहक आता याचा लाभ घेऊ शकतात. ओकारा फ्युलोजिक्स ही लॉजिस्टिक कंपनी आहे. हमसफर आणि ओकारा फ्युलोजिक्स या कंपन्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आगामी काळात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये घरपोच डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट आहे.
नागपूर मध्ये डेंग्यूचा कहर
राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबवली जात आहे. अनेक ठिकाणी सर्वेक्षण करुन विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. नागपुरात आज डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे 8689 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 383 घरांमध्ये डेंग्यूच्या अळी आढळून आल्या.
SD social media
9850 60 3590