एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटर करार पूर्ण केला असून कंपनीची मालकी मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे.रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभ राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्वीटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. ‘‘भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ट्वीट मस्क यांनी केले होते.