आज दि.१० आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

वयाच्या 28 व्या वर्षी आमदार… मुलायमसिंह यादव यांचं निधन

मुलायम सिंह यादव… असं नाव… असा चेहरा… अशी व्यक्ती… ज्यांनी भारतीय राजकारणाचा सर्वात मोठा आखाडा समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाऊल ठेवले, तेव्हा जणू भूकंप आला होता. 1967 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी मुलायमसिंह यादव यांनी पहिली विधानसभा निवडणूक जिंकून राज्याच्या राजकारणात मुलायम युग सुरू झाल्याचे सिद्ध केले. मुलायमसिंह यादव आज आपल्यात नाहीत. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.16 वाजता मेदांता, गुरुग्राम येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या पटलावर आपल्या राजकीय विरोधकांना पराभूत करण्यासाठी राजकीय डावपेच किती महत्त्वाचे असतात, हे उत्तर प्रदेशचे राजकारण समजून घेणार्‍यांना माहीत आहे. कुस्तीचा आखाडा असो की राजकारणाचा आखाडा. मुलायमसिंग यादव हे त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना चितपट करण्यात पटाईत होते.

माजी विद्यार्थ्याचा शिक्षिकेलाच हजारोंचा गंडा, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका माजी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षिकेला हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शिक्षिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे सांगून एका 55 वर्षीय शिक्षिकेला माजी विद्यार्थ्याने गंडवले आहे. आरोपी विद्यार्थ्याने तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे असे या माजी विद्यार्थ्याचे नाव आहे.

असं काय घडलं की करण जोहरने ट्विटरला केलं GOODBYE; सोशल मीडियावर रंगली भलतीच चर्चा

करण जोहर या ना त्या कारणामुळे  कायम  चर्चेत असतो. त्याचा ‘कॉफी  विथ करण’ हा शो तर खूपच हिट ठरला. सोशल मीडियावर हा शो प्रचंड गाजला. करणं जोहर  चित्रपटांव्यतिरिक्त वादांमुळेही चर्चेत असतो. करण काहीही करत नसला तरीही तो वादांचा भाग बनतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हेच कारण आहे  म्हणूनच त्याचे नाव ट्विटरवर नेहमीच ट्रेंड करत असते. मात्र, या सगळ्यानंतरही करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याच्या आयुष्याशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टी इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर शेअर करत असतो. पण आता करण जोहरने अचानक ट्विटरचा निरोप घेतला आहे. करणच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते हैराण झाले आहेत.

करण जोहरने ट्विटर सोडण्यापूर्वी काही वेळ आधी  शेवटचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने  त्याने आपल्या चाहत्यांचा निरोप घेतला आहे. त्याने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामागचं कारण काही चाहत्यांना समजलेलं नाही.  करणने आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी आणखी सकारात्मक उर्जेसाठी जागा निर्माण करत आहे आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर!” करणने अचानक केलेल्या या ट्विटमुळे तो पुन्हा ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

‘मुख्यमंत्री साहेब, अनुदानाचे पैसे द्या, दिवाळीला पुरणपोळी खायला या’ शेतकऱ्याच्या मुलाचं शिंदेंना पत्र

राज्यभरात अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.  हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, अशातच हिंगोलीतील एका चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी यामुलानं हे पत्र लिहिले आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र प्रचंड व्हायरल सुद्धा होतंय.”मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सणाला पुरणपोळ्या मिळाल्या नाहीत. बाबा मला पाणीपुरी खायला दहा रूपये देखील देत नाहीत. आई म्हणतेय शेती नुकसानीचे अनुदान आलं की तुला पैसे देईन. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या”. अशी भावनिक साद हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावच्या एका चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून घातली आहे.

देशाच्या राजकारणाला नवे वळण देणारी बातमी, उद्धव ठाकरे भिडणार थेट नरेंद्र मोदींना?

आगामी 2024 च्या निवडणुकीमध्ये मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. अशाच शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात भाजपने फोडून भगदाड पाडले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमारांच्या लीगमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधी नेता बनवण्याची योजना असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भाजपच्या कार्यशैलीचा ‘बळी’ म्हणून येत्या काळात उद्धव ठाकरेंना दाखवण्याची योजना आखण्यात आल्याचं समजतंय. यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर प्रमुख विरोधी पक्षनेते म्हणून जागा घेण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाला ‘ही’ पक्षचिन्ह मिळण्याची शक्यता

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे.  शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पसंती क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर देण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पर्यायांचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करत या असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाविरोधात अखेर दिल्ली कोर्टात धाव

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेनं आता दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेरीस आता दिल्ली हायकोर्टामध्ये शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली.

रशियाने युक्रेनवर डागले ७५ क्षेपणास्त्र, पाच जणांचा मृत्यू

युक्रेन आणि रशियामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ७५ क्षेपणास्त्र डागले आहेत. क्रिमिया आणि रशियामधील पुलावर स्फोट घडवल्याच्या रशियाच्या आरोपानंतर आज हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शांतताप्रिय लोकांवर केलेला हा निर्दयी हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना झेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांना आम्हाला पृथ्वीवरूनच पुसून टाकायचे आहे, असे म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाला सुनावले आहे.

“गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करणं आमचं काम आहे का? ”; सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला सवाल

गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेमध्ये गायींचं संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायमूर्ती एस. एस. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे.याचिकाकार्त्यांच्या वकिलांनी भारत सरकारसाठी गायींची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय असल्याचा युक्तीवाद केला. यावर न्यायालयाने, “एखाद्या प्राण्याला राष्ट्रीय प्राणी जाहीर करणं हे न्यायालयाचं काम आहे का? अशा याचिका तुम्ही का दाखल करता त्यावर आम्हाला दंड ठोठावण्याशीवाय इतर पर्याय उतरत नाही,” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकार्त्यांना विचारला.

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाला पोहचताच चमकदार कामगिरी, सराव सामन्यात १३ धावांनी विजय

टी२० विश्वचषक २०२२ च्या तयारीत असलेल्या भारतीय संघाने पहिला सराव सामना जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ १४५ धावा करू शकला आणि १३ धावांनी सामना गमावला. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने २९ धावांची खेळी केली. त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांनी चेंडूवर चमकदार कामगिरी केली.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.