भारतीय सैन्य दलाचे जवान देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अखंड पहारा देत असतात. याकरिता सीमेलगतच्या क्षेत्रात चौक्या उभारलेल्या असतात. लष्कराच्या बहुतांश चौक्या सिमेंटने बांधलेल्या असतात. सीमेला लागून असलेल्या अनेक भागांत उभारण्यात आलेल्या या चौक्यांमध्ये अधिक सुरक्षेसाठी वाळूने भरलेली पोतीही तयार करून ठेवलेली असतात. या पारंपरिक पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या चौक्यांच्या निर्मितीसाठी बराच कालावधी लागतो. तसंच खर्चही जास्त येतो. या पार्श्वभूमीवर आयआयटी गुवाहाटीनं एक खास तंत्रज्ञान विकसित केलं आहे. भारतीय लष्करासाठी आयआयटीने थ्रीडी प्रिंटेट मॉड्युलर कॉंक्रीट चौकी तयार केली आहे. या चौकीची काही खास वैशिष्ट्यं आहेत. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याविषयी अधिक माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
देशाच्या सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी भारतीय सैन्य दलाचे जवान तैनात असतात. जवानांसाठी या भागात विशिष्ट अंतरावर चौक्या उभारलेल्या असतात. या चौक्या पारंपरिक पद्धतीने उभारल्या जातात. त्यासाठी प्रामुख्याने सिमेंटचा वापर केला जातो. चौकी उभारल्यानंतर तिच्या बाजूनं वाळूने भरलेली पोतीदेखील ठेवली जातात. अशा चौक्या उभारण्यासाठी बराच खर्च आणि वेळ लागतो. तसंच त्याची वेळोवेळी देखभाल करावी लागते. या पार्श्वभूमीवर गुवाहाटी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीने एका खास तंत्रज्ञानाच्या मदतीनं थ्रीडी प्रिंटेड मॉड्युलर कॉंक्रिट चौकीची निर्मिती केली आहे. या चौक्या खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 24 तासांच्या आत कोणत्याही ठिकाणी ही चौकी उभारता येते. याचा अर्थ असा की शत्रूच्या भागात कमी वेळात या चौक्या उभारून कारवाई करता येऊ शकते.
भारतीय सैन्य दलाच्या इस्टर्न आर्मी कमांडने आयआयटी गुवाहाटीशी एक सामंजस्य करार केला. सैन्यासाठी किफायतशीर आणि टिकाऊ संरक्षण पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी हा करार करण्यात आली. थ्रीडी प्रिंटेड मॉड्युलर कॉंक्रीट चौक्यांची निर्मिती याअंतर्गत करण्यात आली असून, भारतीय जवानांसाठी या चौक्या संरक्षक म्हणून काम करतील.
या थ्रीडी प्रिंटेड मॉड्युलर कॉंक्रीट चौकीची काही खास वैशिष्ट्यं आहेत. अशा प्रकारची चौकी गरजेच्या ठिकाणी 24 तासांत उभारता येते. सैन्यासाठी तयार करण्यात आलेली ही चौकी अगदी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. ही थ्रीडी प्रिंटेड चौकी किफायतशीर असून, ती उभारण्यासाठी फारसा खर्च येत नाही.
‘ही थ्रीडी प्रिंटेड सेंट्री चौकी पूर्णपणे मॉड्युलर आहे. ती अपेक्षित ठिकाणी सहज नेऊन असेंबल करता येते. सेंट्री पोस्टची रचना वक्र भिंतीच्या आकारासारखी आहे आणि तिचं डिझाइन विविध आकारांच्या 36 मॉड्यूलमध्ये विभागलं गेलं आहे. हे इंटरलॉकिंग मॉड्युल स्थानिक साहित्य आणि कॉंक्रीट फॉर्म्युलेशनचा वापर करून प्रिंट केलं जातं’, अशी माहिती आयआयटी गुवाहाटीचे संचालक टी. जी. सीताराम यांनी दिली.
सीताराम यांनी आयआयटी गुवाहाटी कॅम्पसमध्ये भारतीय लष्कराच्या रेड हॉर्न्स विभागाचे ब्रिगेडियर दीपक गौर यांच्याकडे हे स्ट्रक्चर सुपूर्द केलं. `हे प्रगत तंत्रज्ञान भारतीय सैन्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण गरजेनुसार हे मॉड्युलर कंस्ट्रक्शन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजपणे घेऊन जाता येतं. भारतीय लष्कराच्या प्रमुख आघाड्यांवर त्याची गरज आहे,` असं सीताराम यांनी स्पष्ट केलं. ही सेंट्री पोस्ट 2.4 मीटर लांब, 2.4 मीटर रुंद आणि 2.4 मीटर उंच आहे. सर्व मॉड्युलचा एकूण प्रिंटिंग कालावधी सुमारे 42 तास होता.